• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • कोल्हापूरला अवकाळी पावसानं झोडपलं; पुढील 5 दिवस 'या' जिल्ह्यांत वरुणराजाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

कोल्हापूरला अवकाळी पावसानं झोडपलं; पुढील 5 दिवस 'या' जिल्ह्यांत वरुणराजाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद या भागातील शेतकऱ्यांना कालच्या अवकाळी पावासाचा चांगलाच फटका बसला आहे. येथील केळी आणि द्राक्षांच्या बागासोबतच इतर पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 एप्रिल: मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामान सातत्यानं बदलत आहे. सोमवारी सांगली, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुण्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत काही ठिकाणी अंशतः गारपीट झाली आहे. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावाला मात्र अवकाळी पावसानं आणि गारपीटीनं अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामुळे या गावाचं रूप बर्फाच्छादित प्रदेशाप्रमाणे झालं होतं. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाला आलेला घास गारपीटनं हिरावून नेला आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबाद या भागातील शेतकऱ्यांना कालच्या अवकाळी पावासाचा चांगलाच फटका बसला आहे. येथील केळी आणि द्राक्षांच्या बागासोबतच इतर पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. असं असलं तरी अजूनही धोका टळलेल्या नाही. मराठवाड्यापासून दक्षिण किनारपट्टीपर्यंत उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. याचा सर्वाधिक धोका मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्याच्या साथीनं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज सकाळपासून पुण्यातील तापमानदेखील वाढत असून पुणे शहरासह ग्रामीण भागात पावसाची शक्यता आहे. हे ही वाचा-मोफत लसीकरण होणार का? अजित पवारांनी दिले सूचक उत्तर याशिवाय केरळ राज्याच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीसह गोवा या राज्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: