कोल्हापूर, 18 जानेवारी : राज्याच्या 33 जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल (Gram Panchayat Elections Results) यायला आता सुरूवात झाली आहे. यातल्या काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का बसला आहे, तर काही ठिकाणी प्रस्थापितांना त्यांचा गड राखण्यात यश आलं आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील बेगवडे गावात सत्तांतर झालं आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या गटाची या गावात सत्ता आली आहे. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवली आहे. शिवेसना-काँग्रेसने राष्ट्रवादीचा 5-2 असा पराभव केला आहे.
तर दुसरीकडे करवीर तालुक्यातील कोगे गावात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. याठिकाणी शिवसेनेला 11 तर इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकमध्ये मुश्रीफ-मंडलिक गटाने बाजी मारली आहे. मुश्रीफ-मंडलिक गटाचे 6 उमेदवार विजयी झाले, तर 3 जागा विरोधकांकडे गेल्या आहेत. शाहुवाडी तालुक्यातील इंजोळे ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाचा झेंडा लागला आहे. या ग्रामपंचायतीचा निकाल 6-3 असा लागला आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. या निवडणुकींचे निकाल यायला सुरूवात झाली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान केंद्रावर मतांची मोजणी सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र 22 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.