Home /News /maharashtra /

पुण्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संतापजनक प्रकार, बेड न मिळाल्याने 3 रुग्णांचा मृत्यू

पुण्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संतापजनक प्रकार, बेड न मिळाल्याने 3 रुग्णांचा मृत्यू

बेडअभावी 3 रुग्णांचा हकनाक बळी गेल्याने आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

कोल्हापूर, 25 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 380 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 3671 वर पोहचली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचवेळी कोल्हापुरातून एक संतापजनक माहिती समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी पुणे शहरात व्हेटिंलेटर न मिळाल्याने रुग्णांचा जीव गेल्याच्या काही घटना समोर आल्या. त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये बेडअभावी 3 रुग्णांचा हकनाक बळी गेल्याने आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, नुकतंच कोल्हापूरमध्ये अलगीकरण केंद्रातील जेवणात आळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला होता. शिवाजी विद्यापीठातील तंत्रशिक्षण विभागाच्या वस्तीगृहातील अलगीकरण केंद्रात हा प्रकार घडला. त्यानंतर अलगीकरण केंद्रातील लोकांनी चांगलाच गोंधळ घातला. अलगीकरण केंद्रातील लोक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला. कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनची काय असणार स्थिती? कोल्हापूर जिल्ह्यात आज लॉकडाऊनचा 6 वा दिवस आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊनची पुढील दिशा आज ठरणार आहे. सकाळी 11 वाजता पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील कडक लॉकडाऊन उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. अचानक गर्दी होऊ नये यासाठी नियमावली ठरवली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अनलॉक होणार की लॉकडाऊन वाढणार, हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या