Home /News /maharashtra /

धक्कादायक! पॉझिटिव्ह की निगेटिव्हच्या वादात महिलेची रस्त्यावरच झाली प्रसूती

धक्कादायक! पॉझिटिव्ह की निगेटिव्हच्या वादात महिलेची रस्त्यावरच झाली प्रसूती

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हा प्रकार समोर आला.

    कोल्हापूर, 5 सप्टेंबर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह की निगेटिव्ह हा वाद सुरू असताना महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हा प्रकार समोर आला. गडहिंग्लज तालुक्यातील अनेक रुग्णालयाने संबधित महिलेला ऍडमिट करून घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर महिलेची आजरा मधील हॉस्पिटलच्या दारातच प्रसूती झाली. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गडहिंग्लज तालुक्यात सासर आणि आजरा तालुक्यात माहेर असणार्‍या गरोदर महिलेला कोरोनाचा मोठा फटका बसल्याचं दिसून आलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरोग्य व्यवस्थेचा भोंगळपणा वारंवार समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर महिलेचा अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना याआधी कोल्हापुरात घडली होती. त्यानंतर आज कोरोना अहवाल वादामुळे महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. या घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. 'कोल्हापुरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण' एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. 'कोल्हापूर जिल्ह्यावर शेजारील तीन ते चार जिल्ह्यातील रुग्णांचा प्रचंड ताण आहे. सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रुग्णांची व्यवस्था त्या त्या ठिकाणी व्हावी. रुग्णांना नाकारू शकत नाही पण कोल्हापूर जिल्ह्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी,' असं आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं आहे. 'चारही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र लिहून विनंती करणार आहे. कोल्हापुरातून कर्नाटकात होणारा ऑक्सिजन पुरवठा पुढच्या पाच दिवसात रोखला जाईल. नागरिकांनी स्वतःहून काळजी घेऊन घरी थांबावे, आता लॉकडाऊन लावणे शक्य नाही,' असंही सतेज पाटील म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या