अमरावती, 10 मार्च : राज्यभरात उत्साहात धुळीवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, अमरावतीमध्ये एका खुनामुळे होळी रक्तरंजित झाली आहे. भरदिवसा एका तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे.
अमरावती शहरातील मार्डी रोड परिसरात ही घटना घडली. पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, मार्डी रोड परिसरात असलेल्या प्रबुद्धनगर इथं राहणाऱ्या अंकित सदानंद तायडे असं मृतकाचं नाव आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. मृतकाच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव असून अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेश्राम पुढील तपास करीत आहे.
पुण्यात रंग लावण्यावरून दोन गटात तुफान राडा
दरम्यान, पुण्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रकरणामुळे आज धुळवडीत रंगाचा बेरंग झाला. रंग खेळण्यावरून झालेल्या वादानंतर दोन गटात तुफान राडा झाला.
पुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात दोन गटात भर-रस्त्यावर लाठ्या काठ्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रंग लावण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला त्यानंतर या दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या, बॅटने पाठलाग करून मारहाण केली. हा सगळा प्रकार याच परिसरातील एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दोन्ही गटाच्या धुमश्चक्रीत स्थानिक लोकांच्या गाड्यांचीही तोडफोड झाली.
या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.