मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'पवार-ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं', विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन किरीट सोमय्यांचा निशाणा

'पवार-ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं', विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन किरीट सोमय्यांचा निशाणा

भाजप नेते किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. या संघर्षानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेगळाच दावा केला आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session 2021) नुकतंच पार पडलं. हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन वादळी ठरलं. यापैकी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं (Assembly speaker election) प्रकरण प्रचंड गाजलं. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारचा मानस होता. तर विरोधकांचा त्याला विरोध होता. पण विधानसभा कामकाज समितीने अखेर ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यास मंजूर केलं. भाजपने (BJP) या निर्णयावर आक्षेप घेतला होता. भाजपकडून याबाबत शिफारसी केल्या गेल्या. पण समितीने गुप्त मतदान पद्धतीनेच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. संबंधित निवडणुकीचा प्रस्ताव आणि गुप्त मतदानाच्या निर्णयासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना शिफारस करण्यात आली तेव्हा राज्यपालांनी गुप्त मतदान पद्धतीवर आक्षेप घेतला. याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. आता या संघर्षानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वेगळाच दावा केला आहे.

"माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणताही नेता विधानसभेचा अध्यक्ष होऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची होती. त्यातून त्यांनी काँग्रेसची फसवणूक केली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पपलू केला. ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसचा नेता विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नाही. तसेच राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला", असा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हेही वाचा : राज्यात कोरोनाचा उद्रेक असताना नेत्यांकडून नियमांची पायमल्ली, माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नात तुफान गर्दी

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

"शरद पवार, उद्धव ठाकरेंना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कुणी नेता विधानसभेचा अध्यक्ष बनू नये म्हणून त्यांनी दोघांनी मिळून काँग्रेस नेते राहुल गांधींचं पपलू केलं. महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत, भाजपकडे 105, त्यामुळे गुप्त मतदान झालं असतं तर काय फरक पडलं असतं? काँग्रेसचा कोणताही नेता अध्यक्ष होऊ नये म्हणून आवाजी मतदान पद्धतीचं नाटक केलं. राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न आणि काँग्रेसचा अध्यक्ष ठाकरे-पवारांनी होऊ दिला नाही. ही हकीकत आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले.

हेही वाचा : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर! अर्जुन कपूरनंतर नोरा फतेहीला कोरोनाची लागण

राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात लेटरवॉर

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील लेटरवॉरही चांगलंच चर्चेत आलं. राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला परवानगी द्यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने तब्बल तीनवेळा राज्यपालांना पत्र पाठवलं होतं. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांचं एक शिष्ठमंडळ राज्यपालांना राजभवन येथे जावून भेटून आलं. तरीही राज्यपालांनी कायद्याचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत शब्दांत पत्र पाठवलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी देखील त्याच धरतीवर प्रत्युत्तर देणारं पत्र पाठवलं. संबंधित निवडणूक झाल्याच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शिफारस करु, असा इशाराच राज्यपालांनी सरकारला दिला होता. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Kirit Somaiya, Uddhav thackeray, शरद पवार