कल्याण, 9 जून : कल्याण स्थानक परिसरात एक महिला आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यासोबत झोपली होती. तिचा डोळा लागल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी चिमुकल्याचे अपहरण (baby Kidnapping Kalyan) केलं. काही वेळानं बाळ जवळ नसल्याचे तिच्या लक्षात आले, तिने आजूबाजूला शोध घेतला, मात्र बाळ न दिसल्याने याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अवघ्या ४८ तासात अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आणि बाळाला सुखरूप त्या माऊलीच्या स्वाधीन केलं.
विशाल त्र्यंबके, कुणाल कोट, आरती कोट, हिना माजिद, फरहान माजिद अशी आरोपींची नावे आहेत. विशाल याने कुणाल कोटच्या मदतीने या बाळाचं अपहरण केलं. या दोघांनी हे बाळ सांभाळण्यासाठी आरती हिला दिले होते, तिघे हे बाळ हिना माजिद, फरहान माजिद या दाम्पत्याला विकणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी मुले चोरीचा मार्ग निवडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
माजिद दाम्पत्यला दोन मुली असून त्यांना मुलगा होत नसल्यानं त्यांनी वाटेल त्या किमतीत मुलगा दत्तक घेण्याची तयारी दाखविली होती. सुनिता नाथ ही महिला भिक्षुकी आणि इतर काम करून आपल्या ६ मुलांचा सांभाळ करते. राहण्यासाठी घर नसल्यानं ही महिला रस्त्याच्या कडेला थोडी आडोशाची जागा पाहून रात्रीचा निवारा शोधते. तिला ४ मुले आणि २ मुली असून रविवारी रात्री ती नेहमीप्रमाणे एका दुकाना समोर आपल्या मुलाबरोबर झोपली होती. तिला गाढ झोप लागल्याची संधी साधत तिचे सहा महिन्याचे बाळ चोरून नेले होते. तिने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र बाळ न सापडल्याने अखेर या महिलेने याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिकदृष्ट्या तपास करत पोलिसांना दोन आरोपींचा सुगावा लागला.
हेे वाचा - राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकणात NDRFच्या 15 टीम तैनात
हे बाळ अटाळी येथे राहणारा विशाल त्र्यंबके व दिवा येथे राहणारा कुणाल कोट यांनी चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या आधारे पोलिंसानी त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी विशालला राहत्या घरातून अटक केली. त्याने चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत कुणालला दिवा येथून अटक केली. कुणालने हे बाळ त्याची पत्नी आरती हिच्याकडे सांभाळण्यासाठी दिले होते. कुणाल आणि विशाल हे बाळ भिवंडी येथील हिना माजिद,फरहान माजिद या दाम्पत्याला 1 लाख रुपयांना विकणार होते. पोलीस दिवा येथे पोचले मात्र तोपर्यंत आरती व माजीद दाम्पत्य हे रिक्षाने मुलाला घेऊन निघून गेले होते, मात्र पोलिसांनी तत्काळ सदर रिक्षा कल्याण पूर्वेकडील पत्रिपूल येथे अडवून तिघांना अटक करत बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केलं. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केलं जातंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kalyan, Thane crime news