Home /News /maharashtra /

कोकण रेल्वेच्या गर्दीचा फायदा घेत लाखो रुपयांचा चरस आणि गांजा नेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पकडलं रंगेहात

कोकण रेल्वेच्या गर्दीचा फायदा घेत लाखो रुपयांचा चरस आणि गांजा नेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पकडलं रंगेहात

लाखो रुपये किमतीचा चरस आणि गांजा तसंच एक दुचाकीदेखील खेड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

    चंद्रकांत बनकर,खेड, 6 मार्च : शिमगोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात येत असून कोकण रेल्वेला मोठी गर्दी झाली आहे. याच गर्दीतून लाखो रुपयांचा गांजा आणि चरस घेऊन आलेल्या एका इसमाला खेड पोलिसांनी खेड रेल्वे स्टेशनसमोर रंगेहात पकडलं आहे. या व्यक्तीकडून लाखो रुपये किमतीचा चरस आणि गांजा तसंच एक दुचाकीदेखील खेड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कोकणात शिमगोत्सवाचा मोठा सण असून या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. मुंबई येथून कोकण रेल्वेने खेड स्थानकात उतरलेल्या एका इसमावर पोलिसांचा संशय आला. त्याला हटकले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला रेल्वे स्थानकासमोरच अडवले. त्याच्याकडे असलेल्या पिशव्यांची झडती घेतली असता , गांजाने भरलेली मोठी पिशवी आणि चरस आढळली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की, तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर पकडलेल्या गांजा आणि चरसची तपासणी करण्याकरता रत्नागिरी पोलीस मुख्यालयातून फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे . या घटनेच्या पार्शवभूमीवर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर आणखी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सतर्कतेचा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिल्या आहेत. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर खेडमधीलच पण सध्या मुंबके येथे राहणाऱ्या दुदुके ( पूर्ण नाव माहीत नाही ) याला पोलिसांनी हटकले. त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे , श्री नदाफ , आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला रेल्वेतून उतरून एका दुचाकीने खेडच्या दिशेने पळून जाताना रेल्वे स्थानक समोरच पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशव्यांची झडती घेतली असता त्यामध्ये प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरलेला गांजा , आणि प्लॅस्टिकच्या पॅकिंग मध्ये चरस आढळला. हेही वाचा- लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत नराधमाने केला बलात्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गडदे यांनी याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की यांना दिली. त्यांनी खेड च्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार रवींद्र अमेकर हे देखील आले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. गांजा आणि चरस आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला खेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की यांनी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना माहिती दिली. या अमली पदार्थाची चाचपणी करण्याकरता फॉरेन्सिक लॅब रत्नागिरीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या