खेड, 13 जानेवारी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील श्री दुर्गा फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे लागोपाठ झालेल्या 10 ते 12 स्फोटांमुळे लोटे परिसर अक्षरशः हादरून गेला. आग कशामुळे लागली, यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र संपूर्ण कंपनी या आगीत जाळून खाक झाली आहे.
कंपनीत कामावर असलेल्या 5 ते 6 कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तब्ब्ल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
दुपारी 3 वाजता कंपनीत अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि बघता बघता आगीने उग्ररूप धारण केले. थोड्या थोड्या वेळाने लागोपाठ 10 ते 12 मोठे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज आणि धुराचे लोट 10 किलोमीटरपर्यंत दिसत होते. आगीचे वृत्त समजताच लोटे पंचक्रोशीतील शेकडो लोक घटनास्थळी धावले. परिसरात या कंपनी शेजारीच अनेक इतर कंपन्या असल्याने या आगीची झळ त्यांना लागू नये म्हणून अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न केले.
लोटे एमआयडीसी अग्निशामक बंब , तसेच खेड आणि चिपळूण नगर पालिकेच्या अग्निशामक बंबाने आग वीजवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आगीची तीव्रता इतकी होती की 4 बंबाद्वारे आणलेले पाणी देखील पुरत नव्हते. अखेरीस काही अंतरावर असणाऱ्या ए.बी . मौरी , एक्सेल , या कंपन्यांमधून लाखो लिटर पाणी आणि फोम एका पाईपलाईनने आणून आग वीजवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
3 तासानंतर आग आटोक्यात
अग्निशामक बंबाने आणि इतर खासगी टँकरने तसेच ए.बी . मौरी , एक्सेल , या कंपन्यांच्या सेफ्टी टीम आणि एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्ब्ल 3 तासांनंतर अथक प्रयत्न करत पाणी आणि फोमद्वारे आग आटोक्यात आणली. घटनास्थळी खेड पोलिसांनी पंचनाम्याला सुरुवात केली होती.
कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच लागली आग?
नाना चाळके श्री दुर्गा फाईन प्रा. ली या कंपनीला लागलेली ही आग त्या कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळेच लागली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे या कंपन्या पालन करत नाहीत, कंपनीची स्वतःची आग प्रतिबंधक उपाययोजना नव्हती, फायर ऑडिट झालेले नाही, तसंच ज्वलनाग्राही केमिकल साठवताना कसल्याही प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांनी केलेले नव्हते, म्हणून हा अपघात झाला असून कंपनी व्यवस्थापकांवर कारवाईची करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष नाना चाळके यांनी केली आहे.