खेड, 12 मार्च : सहलीसाठी नेपाळला जाऊन आलेल्या खेड तालुक्यातील लोटे येथील 50 शिक्षकांपैकी दोघांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. दोघाही संशयितांना खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी खास तयार करण्यात आलेल्या इन्सुलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत नेपाळला सहलीसाठी गेलेल्या इतर 48 जणांची देखील आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातून एक पथक खेडकडे रवाना झाले आहे, अशी माहिती तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे यांनी दिली आहे
खेडमधील लोटे आणि धामनदीवी परिसरातील लोकप्रतिनिधी आणि खासगी डॉक्टरांनी आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती प्रशासनाला कळवली आहे. नेपाळ येथून आलेल्या दोन जणांना कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे समजताच त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी हलवले. रुग्णालयात त्यांना खास कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष वार्डमध्ये ठेवण्यात आले.
कोरोना संशियतांचे नमुने घेण्यासाठी रत्नागिरी येथून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे पथक दुपारी खेडकडे रवाना झाले आहे. त्यांचे नमुने घेऊन ते लॅबला पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह हे समजणार आहे. मात्र अहवाल येईपर्यंत त्यांना रुग्णालयातील खास कक्षात ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. नेपाळला फिरण्यासाठी गेलेले त्यांचे इतर सहकारी 48 जण असून त्यांचीही आरोग्य तपासणी कसून केली जाणार असल्याचे तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- कोरोना व्हायरसवर लवकरच लस.. इस्रायलमधील शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश
'कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. रुग्णालयात दाखल असलेल्यांना नक्की कोरोना आहे का, हे त्यांच्या तपासणी नंतर जो अहवाल येईन त्यानंतरच ठरणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना खास कक्षात ठेवण्यात आले आहे. ते इतर देशातून आल्याने खास खबरदारीचा उपाय म्हणून केला जात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे,' असे आवाहन प्राजक्ता घोरपडे यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Khed