पोटात असतानाच वडिलांचं निधन...अंगणवाडी मतदनीस आईच्या कष्टाचं चीज करत PSI परीक्षेत मुलीने मिळवलं यश

पोटात असतानाच वडिलांचं निधन...अंगणवाडी मतदनीस आईच्या कष्टाचं चीज करत PSI परीक्षेत मुलीने मिळवलं यश

शिक्षणासाठी आईने घेतलेल्या कष्टाचं चीज करत संध्याराणी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

  • Share this:

करमाळा, 21 मार्च : एकदा यश मिळवण्याचं मनाशी पक्क केलं की मग संकटांच्या छाताडावर पाय देऊन उभं राहता येतं, असं म्हटलं जातं. याचंच उदाहरण करमाळ्याच्या संध्याराणी देशमुख या तरुणीने घालून दिलं आहे. संध्याराणी या आपल्या आईच्या पोटात असतानाच त्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. पण त्यानंतर शिक्षणासाठी आईने घेतलेल्या कष्टाचं चीज करत संध्याराणी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

संध्याराणीचे वडील दत्तात्रय देशमुख यांचे 1994 मध्ये निधन झाले. वडिलांचा सहवास न लाभलेल्या संध्याराणी यांच्यासह तिची मोठी बहीण विद्या अशा दोन मुलींची जबाबदारी त्यांच्या आई निर्मला यांच्या खांद्यावर पडली. अडचणींशी मुकाबला अन् प्रतिकूल परिस्थितीविरोधात संघर्ष करत निर्मला यांनी 2000 मध्ये गावातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम सुरू केले.

अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या निर्मला देशमुख यांना सुरुवातीच्या काळात 500 रूपये मानधन मिळायचे. आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.मोठी मुलगी विद्या हीचे लग्न झाले आहे. तिचेही शिक्षण बी.एस्सी झाले आहे. आपल्या दोन्ही मुली शिकल्या पाहीजे असे त्यांना वाटे.

संध्याराणी देशमुख हिने क्लास न लावता स्वत:च अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सर्वसाधारण जागेवर मुलींमध्ये राज्यात 25 वा क्रमांक पटकावला आहे. संध्याराणी यांनी पदवीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 2016 मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत अवघे तीन गुण कमी पडल्याने पद मिळाले नव्हते. अखेर पुन्हा जिद्दीने केलेल्या प्रयत्नांना यश येवून 2018 च्या परीक्षेत 340 पैकी 225 गुण मिळवून राज्यात महिलांमध्ये 25 वा क्रमांक घेत त्यांनी बाजी मारली.

संध्याराणी यांच्यासाठी आईच ठरली प्रेरणा!

वडिलांच्या निधनानंतर आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीविरोधात लढणारी आई हिच संध्याराणी यांच्यासाठी जिंकण्याची प्रेरणा ठरली. 'लहानपणापासून मी आईचे कष्ट पाहिले आहे. आम्हाला घरची अडीच एकर शेती आहे. मी बारावीपर्यंत आईला शेतीत काम करताना मदत करायची. मी शिकावं, मला नोकरी लागावी अशी आईची खूप इच्छा होती. पोलीस खात्याबद्दल लहानपणापासून आकर्षण होते. आईच्या कष्टांची सतत जाणीव ठेवत रात्रंदिवस मी अभ्यास करत राहिले,' असं संध्याराणी देशमुख सांगतात. संध्याराणी यांच्या यशानंतर त्यांच्या आईसाठी आभाळ ठेंगणं झाल्याचं पाहायला मिळालं.

First Published: Mar 21, 2020 07:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading