लढत विधानसभेची : कणकवलीचा गड नितेश राणे राखणार का?

लढत विधानसभेची : कणकवलीचा गड नितेश राणे राखणार का?

2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी नारायण राणे आणि नितेश राणे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. हे सांगताना नितेश राणे कणकवली मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही राणेंनी स्पष्ट केलंय.

  • Share this:

कणकवली, 17 सप्टेंबर : सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे असं एक समीकरणच कोकणच्या राजकारणात झालं होतं. 34 वर्षं शिवसेनेत राहिलेल्या आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, मंत्री अशी महत्त्वाची पदं मिळालेल्या नारायण राणेंनी 2005 साली शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राणेंनी शिवसेनेच्या परशुराम उपरकरांचं डिपॉझिट जप्त करुन दाखवलं.

त्यानंतर 2009 च्या निवडणुकांआधी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि राणेंचा मालवण कणकवली मतदार संघ विभागला जाऊन कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांचा एक मतदारसंघ झाला . कणकवलीच्या जागी मालवणला कुडाळ तालुका जोडला गेला आणि मालवण कुडाळ तालुक्यांचा दुसरा मतदारसंघ तर सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुक्यांचा तिसरा विधानसभा मतदारसंघ झाला .

बदललेल्या कणकवली मतदारसंघात राणेंनी आपल्या जागी त्यांचे मुंबईतले समर्थक रवी फाटक यांना काँग्रेसकडून मैदानात उतरवलं आणि स्वत: मालवण कुडाळ मतदारसंघ निवडला. याच काळात राणेंबद्दल सिंधुदुर्गात नाराजीचं वातावरण वाढू लागलं. फाटक याना राणेंनी तिकीट मिळवून दिल्यामुळे राणेंचे कट्टर समर्थकही दुखावले गेले.

2009 मध्ये पराभव

याचा परिणाम म्हणून राणेंनी पूर्ण ताकद लावलेली असतानाही 2009 च्या अत्यंत अटीतटीच्या विधानसभा लढतीत राणेसमर्थक रवी फाटक यांचा भाजपाच्या प्रमोद जठारानी अवघ्या 34 मतानी पराभव केला आणि राणेंच्या बालेकिल्ल्याला पहिला सुरुंग लावला. तरीही राणे सत्ताधारी पक्षातले मंत्री असल्यामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणावर नारायण राणेंचाच प्रभाव कायम होता .

2009 नंतरच्या पाच वर्षांत नारायण राणेंचा सिंधुदुर्गवरचा प्रभाव आणखी कमी झाला. आणि मालवणच्या पोटनिवडणुकीत अख्ख्या शिवसेनेला टक्कर देत परशुराम उपरकरांचं डिपॉझिट जप्त करुन दाखवणारे नारायण राणे 2014 साली मात्र मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्याच वैभव नाईकांकडून तब्बल 10 हजार मतांनी पराभूत झाले.

लढत विधानसभेची : ठाणे शहर मतदारसंघ कुणाकडे जाणार?

राणेंना हा त्यांच्याच जिल्ह्यात झालेला पराभव अत्यंत जिव्हारी लागला. राणेंचा पराभव झाला तरी त्यांचा मुलगा नितेश राणेंनी मात्र काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि फाटकांना 34 मतांनी हरवणाऱ्या भाजपाच्या प्रमोद जठारांना तब्बल 25 हजार मतांनी हरवून कणकवली पुन्हा काबीज केली. त्यावेळी आपला जरी अस्त झाला असला तरी नितेश राणेचा उदय झाला आहे असं सूचक वक्तव्य नारायण राणे यानी केलं होतं.

स्वाभिमान पक्षाची स्थापना

2014 नंतर मात्र नारायण राणे यांच्या जवळचे सहकारी त्याना सोडून गेले. केंद्रात आणि राज्यातही भाजपा शिवसेनेची सत्ता आल्यामुळे राणेंचं राजकीय वजन आणखी कमी होत गेलं. अखेर काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देत राणेंनी स्वत:च्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. या पक्षाला NDA मध्ये सामील करत भाजपाचा आधार घेत त्यांनी राज्यसभेची खासदारकी मिळवली.

दरम्यान 2019 च्या म्हणजेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा मुलगा निलेश राणे यांचाही दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे निलेश राणेंचे बंधू नितेश यांना 2014 ला कणकवली मतदारसंघात मिळालेलं 25 हजाराचं मताधिक्य कमी होउन ते 10 हजारावर आल्याचं या लोकसभा निवडणूक निकालातून पुढे आलंय .

या सगळ्या पार्श्वभूमीवर 2019 ची विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणुकीआधी नारायण राणे आणि नितेश राणे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. हे सांगताना नितेश राणे कणकवली मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.त्यातच राणेंना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या नाराजीला तोंड द्यावं लागतंय. अशा सगळ्या परिस्थितीत नितेश राणे आपला मतदारसंघ राखतील का याबबतच्या चर्चा आता या मतदारसंघात सुरू झाल्या आहेत.

======================================================================================

SPECIAL REPORT: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'!

First published: September 17, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading