मुंबई, 16 ऑक्टोबर: जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी ठाकरे सरकारमधील एका मोठ्या मंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कन्हैय्या कुमार यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात भेट घेतली. कन्हैय्या कुमार हे जवळपास 20-25 मिनिटे जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात होते. या भेटीचं कारण अस्पष्ट असलं तरी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
हेही वाचा...महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
उभय नेत्याच्या झालेल्या या बैठकीत बिहार निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याचं समजते. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर एरव्ही प्रसारमाध्यमांशी स्वत: हून बोलणारे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांनी मात्र यावेळी बोलणे टाळलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कन्हैय्या कुमार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे. कन्हैय्या कुमार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक प्रचार केला होता.
…तर मी भाजपमध्ये प्रवेश करीन
बिहारच्या निवडणुकीच्या मैदानात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि स्टार प्रचारक (सीपीआय) नेते कन्हैया कुमार उतरले आहेत. कन्हैया कुमार यांनी बेगूसराय येथून निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणूक अभियानात भारतीय जनता पक्षावर जोरदार प्रहार केले. तुम्ही मला सतत देशद्रोही म्हणाल, तर मी भाजपत प्रवेश करीन, असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना ते वाईट होते, त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हापासून ते भाजपचे झाले, असंही कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या प्रखर टीकेला या नेत्यानं दिलं उत्तर
कन्हैय्या कुमार यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपल्या भाषणात ते हे वाक्य बोलताना दिसत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून राजकारण तापलं आहे.
दरम्यान बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असता त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.