आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने दिले कर्तव्याला प्राधान्य, गर्भवती महिलेच्या प्रसूतीनंतर केले मातेवर अंत्यसंस्कार

आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केली.

आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केली.

  • Share this:
कल्याण, 8 जून : एकीकडे गर्भवती महिलेला दाखल करून न घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याची ठाण्यातील घटना ताजी असतानाच कल्याण शहरात मात्र बरोबर याच्या उलट प्रकार घडला आहे. आपल्या आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केल्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे.  कल्याणातील गर्भवती महिला शबा शेख ही प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात गेली होती. परंतु त्याठिकाणी आयसीयू नसल्याने तिला कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेला कुटुंबियांनी कळवा रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून दुसऱ्या दिवशी तिला सोडून देण्यात आले. हा सर्व प्रकार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना समजताच त्यांनी तातडीने कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून या महिलेची प्रसूती करण्याची विनंती केली. त्यावर डॉ. प्रशांत यांनीही तातडीने प्रतिसाद देत आयएमएकडून या महिलेची निःशुल्क प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या महिलेला कल्याणातील वैष्णवी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेही वाचा - लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको याठिकाणी तिची प्रसूती होत असतानाच मुख्य डॉक्टर अश्विन कक्कर यांच्या मातोश्री मधूलिका कक्कर यांचे निधन झाले. मात्र स्वतःवर कोसळलेले एवढे मोठे दुःख बाजूला ठेवत डॉ. अश्विन कक्कर यांनी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत या महिलेची सुखरूप प्रसूती केली आणि त्यानंतर आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले. एकीकडे जन्मदात्रीचा झालेल्या मृत्यू तर दुसरीकडे नव्या बाळाला जन्म देणारी ती अनोळखी माता. अशा कसोटीच्या काळातही डॉक्टर अश्विन यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published: