महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनकडे? कल्याण-डोंबिवलीत नवा आदेश, टाळेबंदीचा कालावधी वाढला

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनकडे? कल्याण-डोंबिवलीत नवा आदेश, टाळेबंदीचा कालावधी वाढला

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता अन्य शहरे आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे.

  • Share this:

कल्याण-डोंबिवली, 11 जुलै : महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आता आणखी गडद होऊ लागलं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता अन्य शहरे आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला जाऊ लागला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतही (Kalyan Dombivali) लॉकडाऊनबाबत नवा आदेश काढण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जुलैला या भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन 12 जुलैपर्यंत असेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात न आल्याने लॉकडाऊन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्यानंतर या काळात आधीचेच नियम लागू असतील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रा पुन्हा लॉकडाऊनकडे?

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागात आता पुन्हा लॉकडाऊन केला जाऊ लागला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर नांदेड जिल्हा, भुसावळ शहर, परळी शहर अशा अनेक ठिकाणी कडक निर्बंध करण्यात आले आहेत.

लॉकडाऊनविषयी शरद पवार काय म्हणाले?

'लॉकडाऊनसह कायम जगावं लागेल असं मला वाटत नाही. अलीकडेच मी काही तज्ञांशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की, साधारणतः जुलै महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापासून तो ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण खाली जाईल आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल,' असा अंदाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 11, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या