डोंबिवली, 21 डिसेंबर : कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivali) घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसही या गुन्ह्याचा तपास करीत चोरीच्या प्रकरणातील तब्बल 12 अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे चोरटे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या चौकशीत 8 गुन्हे उघडकीस आले असून लाखों रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात मानपााडा पोलिसांना (Manpada Police Station) यश आलं आहे.
कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात तीन दिवसांत 11 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान चोरीच्या वाढलेल्या घटनांवरून स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी, कोंबिग ऑपरेशन राबविलं.
हेही वाचा...शरद पवारांचा शब्द ठरला महत्त्वाचा, दिवंगत भारत भालके यांच्या सुपुत्राची बिनविरोध
पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी काही प्रकणात सीसीटीव्ही वापर केला. त्याचबरोबर रेकॉर्डवरील चोरीच्या प्रकरणातील जे गुन्हेगार जामिनावर कारागृहाच्या बाहेर आहेत. त्यांची शोध मोहीम राबवत तब्बल 12 आरोपींना अटक केली.
कल्याण शीळ मार्गावर मोबाईल दुकानाचे शटर उचकटून 3 लाख 36 हजार 377 रूपये किमतीचे मोबाईल, एलसीडी टीव्ही असा मुद्देमाल चोरणाऱ्या शहजाद अन्सारी, समीर शेख आणि सद्दाम शेख या तिघांना मुंबईतील गोवंडी येथून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह चोरी केलेला 1 लाख 18 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. घरफोडीच्या गुन्ह्यात शेहजाद शेख, मुमताज शेख, इम्रान खान, इरफान शेख या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 मोबाईल, लॅपटॉप, म्युझिक सिस्टिम, बॅटऱ्या आणि रोकड असा 62 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्ह्यातील विनय प्रजापती, सुनील जैस्वार आणि भावेश भोईर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा 1 लाख 7 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 7 नोव्हेंबरला कैलास भंडारी यांच्यावर वार करून पसार झालेल्या कृष्णा कुशलकर आणि शुभम पेटेकर या दोघांनाही पुणे येथून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा...देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी...
या कारवाईत पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश डांबरे आणि पोलीस उपनिरिक्षक अनंत लांब आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kalyan, Maharashtra police