शिवसेना खासदार ओमराजेंवरील चाकूहल्ल्यानंतर उस्मानाबादमध्ये राजकारण तापलं

ओमराजेंवरील हल्ल्यानंतर उस्मानाबादमधील राजकारणालाही वेग आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 03:43 PM IST

शिवसेना खासदार ओमराजेंवरील चाकूहल्ल्यानंतर उस्मानाबादमध्ये राजकारण तापलं

कळंब, 16 ऑक्टोबर : राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच उस्मानाबादमधील कळंब इथं धक्कादायक प्रकार घडला. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरूणाने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर उस्मानाबादमधील राजकारणालाही वेग आला आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कळब शहर बंद ठेवण्यात आलं आहे. 'गेल्या काही दिवसांपासून माझ्या सभांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज तर थेट माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. याबाबत मी कुणावर आरोप करणार नाही, मात्र याबाबत मी पोलिसांना अवगत केलं आहे,' असं ओमराजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळातही या मुद्द्यावरून उस्मानाबादमधील राजकारण पेटणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, कळंब तालुक्यातल्या नायगाव पाडोळी गावात ओमराजेंवर चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात ओमराजे यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरी हल्लोखोराला त्यांच्या पोटात चाकू मारायचा होता, असे ओमराजेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितले.

ओमराजे यांच्यावर हल्ला करून हल्लोखोर तरुणाने तिथून पळ काढला. यासंदर्भात बोलताना ओमराजे म्हणाले, मी गाडीतून खाली उतरलो. तेव्हा समोरून गर्दी येत होती. या गर्दीतच संबंधित हल्लोखोर तरुण होता. गर्दी जवळ आल्यावर हा तरुण माझ्या समोर आला आणि त्याने प्रथम नमस्कार केला. त्यानंतर त्याने माझा उजवा हात हातात घेतला आणि चाकूने पोटाच्या दिशेने वार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर चाकू मारत असल्याचे लक्षात येताच मी डाव्या हाताने हल्ला रोखला. त्यामुळे चाकूचा हल्ला डाव्या हाताच्या घड्याळावर लागला. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला. हा तरुण कोण आहे यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

हल्ल्यात जनतेच्या आशिर्वादामुळे वाचल्याचे ओमराजेंनी सांगितले. हल्ला कोणी केला यासंदर्भात काहीच माहिती नाही. पण संबंधित तरुण गावातील असल्याचे समजते आणि तो अधून मधून पुण्याला असतो, असे ते म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून माझ्या सभेत दारू पिऊन माणसे पाठवली जात आहेत. सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ओमराजेंनी सांगितले. यासंदर्भात आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Loading...

सोशल मीडियावरून केले आवाहन

या घटनेनंतर ओमराजे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. 'मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे .माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे .सुदैवाने जखम खोल नाही . शिवसेना , भाजपा आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाना विनंती आहे की शांतता राखावी . आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे , प्रचाराचे थोडेच दिवस शिल्लक आहेत , अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही,' असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

SPECIAL REPORT: नात्यांमुळे नेत्यांसमोर पेच; लक्षवेधी लढतीत कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...