सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी जालना, 19 जानेवारी : 'सेना भाजप युती न झाल्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील', असं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे म्हणाले होते. त्यांच्या या भाकिताला दुजोरा देत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही या निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा पराभव अटळ असल्याचं बोलून दाखवलं आहे.
संजय काकडे यांच्या भाकितावर अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, 'संजय काकडे यांचा सर्व्हे आजपर्यंत खरा ठरला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पक्षबळामुळेच दानवे निवडून आले होते. काकडे यांनी यापूर्वीही अनेक निवडणुकांचा सर्व्हे केलेला असून त्यांचे आजवरचे सर्व भाकीत खरे ठरलेले आहेत. त्यांना शिवसेनेची ताकद माहित असून जालन्याच्या ही चांगला अभ्यास आहे', असंही खोतकर म्हणाले.
'दानवे यांनी विरोधी पक्षांबरोबरच स्वपक्षीयांशीही शत्रुत्त्व घेतलेलं असल्यानं युती हो अथवा न हो यंदा त्यांचा पराभव अटळ असून पराभवाचा आकडा काकडेंनी वर्तवलेल्या आकड्यांपेक्षाही खूप अधिक असेल', असंही खोतकर म्हणाले आहे.
काय म्हणाले होते संजय काकडे?
'भाजप शिवसेना युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे हे दीड लाख मतांनी पराभूत होतील', असा दावाच संजय काकडेंनी केला होता. 'दानवे यांच्या मतदारसंघाचा मी सर्व्हे केला आहे. माझा सर्व्हे कधी चुकत नाही', असंही काकडे म्हणाले. एवढंच नाहीतर माझा सर्व्हे चुकला तर मी राजकीय संन्यास घेईन, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
=================