खळबळजनक! भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या आईला धमकी

खळबळजनक! भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या आईला धमकी

समरजीत यांच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना पाच वेळा फोन करून धमकी देण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 8 ऑक्टोबर : कागल विधानसभा मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केलेल्या समरजीत घाटगे यांच्या आईला फोनवरून धमकी देण्यात आली आहे. 'समरजीत घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा,' असं म्हणत फोनवरून धमकी देण्यात आली. समरजीत यांच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना पाच वेळा फोन करून धमकी देण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत समरजीत हे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत. भाजपमधून उमेदवारी मिळावी, यासाठी समरजीत यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र आता त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्या आईला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कागल मतदारसंघ हा आतापर्यंत युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे राहिला आहे. यावेळी मात्र कागलवर भाजपकडून दावा सांगितला जात होता. भाजपच्या समरजितसिंह घाटगे यांनी आधी थेट स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत कागल शहरामधून रॅली काढली होती. कागल शहरात समरजित सिंह घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. मात्र नंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकली नाही.

कागलमध्ये तिरंगी लढत, कोण आहेत उमेदवार?

हसन मुश्रीफ(राष्ट्रवादी)

संजयबाबा घाटगे(शिवसेना)

समरजित घाटगे(अपक्ष)

हसन मुश्रीफ यांचं आव्हान

राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे सध्या कागल मतदारसंघातून आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक गड कोसळले. मात्र कागलवर पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वी मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापाही टाकला होता. त्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातारवरण ढवळून निघालं होतं.

मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर तालुक्यात दोन मतप्रवाह समोर आले होते. विरोधकांनी मुश्रीफांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर भाजप प्रवेश न केल्याने सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: October 8, 2019, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading