महाराष्ट्र काँग्रेसला आता दिल्लीतूनही झटका, मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

महाराष्ट्र काँग्रेसला आता दिल्लीतूनही झटका, मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला अल्टीमेटम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी राज्यात सुरू असलेल्या पक्षांतरामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. अशातच आता दिल्लीतील घडामोडींमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे आक्रमक नेते आणि महाराष्ट्र उमेदवार छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला अल्टीमेटम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मध्य प्रदेशात भाजपला धक्का देत काँग्रेसने सत्ता मिळवली. पण त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षनेतृत्वाने अनुभवी कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असणारे ज्योतिरादित्य सिंधिया पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. अशातच आता ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद हवं आहे. हे पद न मिळाल्यास आपण पक्ष सोडू, असा अल्टीमेटम त्यांनी पक्षाला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच सिंधिया हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे डॅमेज कण्ट्रोल करण्यासाठी काँग्रेसकडून काय प्रयत्न केले जातात, हे पाहावं लागेल.

ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाराष्ट्र काँग्रेस

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया यांना महाराष्ट्र विधानसभेसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ठरविण्यासाठी छाननी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधिया यांनी पक्ष सोडल्यास महाराष्ट्रातील काँग्रेसलाही धक्का बसू शकतो.

काँग्रेस छाननी समितीची बैठक.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस छाननी समितीची बैठक नुकतीच पार पडली.  काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ही छाननी समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील निवडक नेते सहभागी झाले होते.

VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या