जुन्नर, 20 नोव्हेंबर : एकीकडे कोरोना आणि त्यानंतर आलेल्या आस्मानी संकटातून बळीराजा आता कुठे सावरतो असं होत असतानाच जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीला कवडीमोल देखील भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याला भाजी फेकून देण्याची वेळ आली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात कोथंबीर आणि शेपूची आवक झाली. कोथिंबीर आणि शेपूच्या भाजीला योग्य भाव मिळत नसल्यानं लाखोंच्या जुड्या आवारातच सोडाव्या लागल्या.
भाज्यांच्या जुड्या अखेर शेतकऱ्यांनी परिसरातील जनावरांना खायला दिल्या. कोथिंबीर आणि शेपूची भाजी शेतकऱ्यांनी गायी-म्हशींना खायला दिली. कवडीमोल देखील भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते पण जड अंत:करणानं त्यानं भाज्यांच्या जुड्या जनावरां पुढे ठेवल्या.ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यावर शेतमालाला भाव नसल्याने ही परिस्थिती आल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यातून कुठे सावरतो म्हणेपर्यंत मुसळधार पाऊस आणि महापुरात शेतात आलेलं उभं पीक भुईसपाट केलं. अशा सर्व परिस्थितीशी दोन हात करत शेतकऱ्यानं पुन्हा पेरलेल्या भाजीलाही आता योग्य भाव मिळत नसल्यानं हतबल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यानं अखेर सगळ्या पेंड्या गायी-म्हशींच्या पुढ्यात टाकल्या आहेत.