'गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला', जितेंद्र आव्हाडांचा घणाघाती हल्लाबोल

'गणेश नाईक, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला', जितेंद्र आव्हाडांचा घणाघाती हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी गणेश नाईकांनी 'यह तेरे बस की बात नहीं...जा अपने बाप को बुला' असं वक्तव्य केलं होतं

  • Share this:

मुंबई, 10 मार्च : महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत राजकीय धुमशान सुरू झालं आहे. राष्ट्रवादी विरुद्ध गणेश नाईक यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्याचं प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाडांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी गणेश नाईकांवर आगपाखड़ केली आहे.

वाचा, जितेंद्र आव्हाडांची फेसबुक पोस्ट -

''प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे.

जे दुसऱ्याच्या हक्काचं आहे, ते ओरबाडून खायचं या लुटारु मानसिकतेतून नाईक कधीच बाहेर पडले नाहीत. कधी पडू शकतील याची शक्यता नाही. २५ वर्षे सत्ता हातात असून सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी नवी मुंबईसाठी काही भव्यदिव्य केलं असं एकही उदाहरण नाही. आज जी नवी मुंबई, तिच्यातल्या पायाभूत सुविधा दिसतायत, त्यातील ८५% सिडकोने उभारलेल्या आहेत हे नव्या पिढीने आधी लक्षात घ्यावं. रस्ते, वीज वितरणाचं जाळं, उद्यानं, शाळा, घरबांधणी, कम्युनिटी केंद्रं, रुग्णालयं, इथपासून ते रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडं हे सारं करून १९९५ साली सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेच्य हाती दिली. भविष्यात शहर मोठं झाल्यानंतर त्याच्या गरजा वाढतील हे ध्यानात घेऊन सामाजिक कामांसाठी ७८० विकसित भूखंड पालिकेला मिळाले.

नाईकांना काहीही कष्ट न करता मिळालेला हा एक हुंडा होता. किमान आता तरी त्यांनी नव्या मुंबईला नीट, सन्मानाने नांदवावी अशी माफक अपेक्षा होती. पण वाटमाऱ्या करायची त्यांची जुनी सवय काही गेली नाही. बेलापूरमध्ये खाडीच्या काठावर अनधिकृत ग्लास हाऊस, आणि तुर्भ्याला एम आय डी सी ची जमीन बळकावून तिथे बावखळेश्वर मंदिरात त्यांनी आपले मांडवळ्या करायचे दरबार सुरु केले. संदीप ठाकूर हा एकांडा सामाजिक कार्यकर्ता याविरुद्ध लढला. पुढे मुंबई उच्च न्यायालयाने हे दोन्ही नाईकवाडे बुलडोझर लावून जमीनदोस्त केले.

पण या महाशयांना शरम नाही. इतक्या चोऱ्यामाऱ्या करत असताना, तिथल्या मूळ आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांसाठी यांनी काय केलं? आज ३० वर्ष झाली, त्यांच्या गावठाणांचा साधा सर्व्हे झालेला नाही. गावठाणांच्या सीमा निश्चित नाहीत. आपल्या वडिलोपार्जित जुन्या घरात एक नवी खोली जरी बांधली तरी पालिकेचा कुणीतरी आयुक्त ती पाडायला फौजफाटा पाठवतो. सतत भीतीच्या छायेत हे गावकरी जगतात. वाढत्या कुटुंबाच्या गरजा त्यांनी भागवायच्या कशा? सत्तेवर असताना नाईक यांनी कधी या प्रश्नांचा पाठपुरावा केल्याचं मला आठवत नाही, की गेल्या पाच वर्षात त्यासाठी ते रस्त्यावर उतरले असं दिसलं नाही.  स्वतः मंत्री, एक मुलगा खासदार, दुसरा आमदार, पुतण्या महापौर, अशी आपली नाईक निझामशाही निर्माण करण्यातच यांचा वेळ गेला. बरं, यांच्या वंशावळीतला एकतरी कुलदीपक बरा निघावा. एकजात सारे पोरकट. बुद्धी, विचार, अभ्यास, व्यासंग, जाण, आणि जाणीव हे यांच्या शब्दकोषातून गायब असलेले शब्द आहेत. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? विजय नहाटा एकदा एका सभेत म्हणाले होते, "भारतात वयोमर्यादा शिथिल केली तर आपल्या शाळकरी नातवंडांना सुद्धा हे महापौर करतील!"

नवी मुंबई ही नवी मुंबईच राहिली पाहिजे. ती नाईक मुंबई बनता कामा नये.

आज ते थेट विरोधात असल्यामुळे माझ्यावर पक्षशिस्तीचं बंधन नाही, जे इतकी वर्ष होतं. माझ्या एका भाषणामुळे ते गटारी पातळीवर उतरले आणि त्यांनी थैय्या केला. आता मी त्यांना भरतनाट्यम, ट्विस्ट, डिस्को, झुंबा, आदिवासी डान्स, कोळी नृत्य, सालसा, लांबाडा, आणि आयटम नाचसुद्धा करायला लावणार आहे. नाहीतरी या पक्षातून त्या पक्षात नाचायची सवय त्यांना आहेच.

"मी येतोय गणेश नाईक. सराव सुरु करा. मी तुमचा बाप काढणार नाही. पण बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल म्हणून नक्कीच सांगणार."

दिघ्यात घर पाडताना किंवा आगरी समाजाच्या गावं मधली जुनी घर पाडतांना जसे तुम्ही लपून बसलात तसे हा जितेंद्र करणार नाही ... वेळे प्रसंगी सरकार सोडावे  लागले तरी चालेल पण एक ही घर तोडू देणार नाही ...अणि  मी हे करून दाखवले आहे ... जाऊन विचारा विटाव्यात .. लोकांच्या घरापेक्षा पद महत्वाचे नाही''

- डॉ. जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण मंत्री,

महाराष्ट्र सरकार

संबंधित - गणेश नाईकांना 'कोरोना व्हायरस'चा Brand Ambassador करा; आव्हाडांची खोचक टीका

गणेश नाईकांनी केली होती विखारी टीका

'माझ्यावर खंडणीखोर असल्याचा आरोप केला जात आहे. पण माझ्याविराधात आतापर्यंत एकही तक्रार दाखल नाही. मी जर खरंच खंडणीखोर आहे तर जा ना पुरावे घेऊन केस करायला...आता निवडणूक आल्यानंतर ज्यांची कुवत आहे तेही बोलतील ज्यांची कुवत नाही तेही बोलतील. एकच म्हणतो...यह तेरे बस की बात नहीं...जा अपने बाप को बुला....और नाम पुछा तो बोल गणेश नाईक,' असं म्हणत गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता.

First published: March 10, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading