मुंबई, 20 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi या चित्रपटावरुन एका नाव निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची भूमिका साकारली आहे. याच मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही महात्मा गांधी यांच्या विचारांना मानणारी आणि आदर करणारी आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीच नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला चित्रपट हा अनपेक्षित असल्याची भूमिका आता काही नेत्यांकडून मांडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर आपली स्पष्ट भूमिका ट्विटरवर मांडली आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असं रोखठोक मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
"डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही", अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही
अंकुश काकडेंचीदेखील टीका
विशेष म्हणजे या चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीदेखील रोखठोक भूमिका मांडली आहे. अमोल कोल्हे यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासी संलग्न अशीच हवी, असं मत अंकुश काकडे यांनी मांडलं आहे. "अमोल कोल्हे यांचं स्टेटमेंट तुम्ही वाचून दाखवलं. ते कलाकार म्हणून त्यांना ते पटत असलं तरी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करताना आपली काही जबाबदारी असते. कलाकार हा राजकीय, धार्मिक, सामाजिक या सगळ्यांपेक्षा वरचढ असतो हे मान्य केलं तरी ज्यावेळेला आपण एखादा पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतो त्यावेळेला आपली जबाबदारी असते. त्या पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत अशीच आपली वागणूक असली पाहिजे", अशी प्रतिक्रिया अंकुश काकडे यांनी दिली.
(अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ)
'हे कोणत्याही भारतीयासाठी योग्य नाही'
"अमोल कोल्हे यांनी आज किती जरी सांगितलं तरी ते आज एका पक्षात खासदार म्हणून काम करतात. अशावेळी त्यांची ही भूमिका योग्य नाही. त्यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न अशीच असावी. अर्थात त्यांनी वैयक्तिरित्या काय करणं हा त्यांचा प्रश्न आहे. तरी महात्मा गांधींचा ज्याने खून केला त्याची भूमिका करणं हे कोणत्याही भारतीयासाठी योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार म्हणून काम करणाऱ्या माणसाला तसा अधिकार निश्चित नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी माझी योग्य ती भूमिका त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवेल. त्यांना तो चित्रपट प्रदर्शित हऊ नये, अशी विनंती करेन", असं देखील अंकुश काकडे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.