मुंबई , 9 नोव्हेंबर: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळतय. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. या बैठकीला सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना देखील सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोधत केला. अखेर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हटल आव्हाड यांनी?
सुप्रिया सुळे यांना ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोध केल्यानंतर यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्राच्या मातीतून 48 खासदार लोकसभेत गेले आहेत. जेव्हा-जेव्हा महाराष्ट्राच्या मातीचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा-तेव्हा या 48 खासदारांनी पक्षभिनिवेश विसरून एकत्र यावं ही सगळ्या मराठी जनांची इच्छा आहे. हे त्यांच्या मनात आहे. पण, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मईंच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकी दिसली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव' असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मईंच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकी दिसली नाही हे महाराष्ट्राचं दुर्देवं. आपल्या माणसांना मारलं जातयं, आपली माणसं मार खात आहेत आणि तरिही आपण एकत्र येत नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2022
ट्विट करत निशाणा
'आपल्या माणसांना मारलं जात आहे, आपली माणसं मार खात आहेत आणि तरीही आपण एकत्र येत नाही. हा विखुरलेला महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी छत्रपती शिवराय बघत असतील तर काय विचार करीत असतील? 'अस ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
हेही वाचा : मोठी बातमी : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; सुप्रिया सुळे यांच्या 'त्या' निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक
नेमकं काय आहे प्रकरण?
आज महाविकास आघाडीच्या खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. या बैठकीला सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना देखील नेण्याचा प्रयत्न केला. मात्र याला ठाकरे गटाच्या खासदारांकडून विरोध झाला. या विरोधानंतर अखेर धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, NCP, Shiv sena, Supriya sule, Uddhav Thackeray