पुणे, 20 जानेवारी: ‘जेईई’ मुख्य या सामायिक प्रवेश परीक्षेत पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या राज आर्यन अगरवाल याने 100 पर्सेटाइलसह देशात दुसरा क्रमांक मिळवला. राजचे शिक्षण पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये झाले. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर राजने आयआयटीला प्रवेश मिळवण्याचे ध्येय ठेवून अभ्यास केला आणि यश मिळवले.
दोन वर्ष अमेनोरा शाळेत शिक्षण घेतल्यानंतर राजने पालिका शाळेत प्रवेश घेतला होता. तेव्हा त्याच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अन्य गोष्टीत वेळ वाया घालवायचा नसल्याने मी केवळ आयआयटीला प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी क्लास लावल्याचे राजने सांगितले.
‘जेईई’साठी मी रोज 5 तास अभ्यास करत होते. विषयाचा आनंद घेत अभ्यास केल्याने अगदी व्यवस्थित अभ्यास झाल्याचे तो म्हणाला. मुंबई आयआयटीमध्ये संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची राजची इच्छा आहे.
अगरवाल कुटुंबीय मुळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. चार वर्षापूर्वीच ते रशियातून पुण्यात स्थायिक झाले होते. राजचे वडील पेट्रोकेमिकल अभियंता असून आई विज्ञानाची पदवीधर आहे.
दोन वर्ष कुटुंबापासून दूर राहून अंकितने मिळवले यश
मुंबई: जेईई परीक्षेत मुंबईच्या अंकित कुमार मिश्रा याने 100 पर्सेंटाइलसह यश मिळवले. कांदिवलीतील रहिवासी असलेल्या अंकितला हे यश मिळवण्यासाठी कुटुंबापासून दूर रहावे लागले. जेईईच्या तयारीसाठी त्याने 10वी नंतर कोपर खैरणे येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथील एका क्लासमध्ये त्याने जेईईची तयारी केली.
यश मिळवण्यासाठी अंकितने मेहनत तर घेतली पण परीक्षेच्या तयारीसाठी तो आई-वडील आणि कुटुंबापासून लांब राहिला. आज अंकितने मिळवलेल्या यशासाठी तो दोन वर्ष कुटुंबापासून दूर राहिला होता. इंजिनिअर होण्याची प्रेरणा अंकितने त्याच्या मामापासून मिळाली.