नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 20 मार्च : उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि अन्नासाठी भटकंती करावी लागते. अनेकदा त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. अन्न आणि पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील जीवनराव पारे विद्यालयातील मुला-मुलींनी पक्षांसाठी घरटे बांधून त्यात अन्न पाण्याचीही सोय केली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त जाणून घेऊया विद्यार्थांच्या या स्तुत्य उपक्रमाविषयी.
आकर्षक घरटे केले तयार
जीवनराव पारे विद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारची झाडे आहेत. या वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबुतर, राघू, चिमण्या नेहमी येता असतात. शाळा सुरू असल्यावर त्यांना अन्न व पाणी मिळते. परंतु, उन्हाळ्यात शाळा बंद असल्यावर त्यांना ते मिळत नाही. म्हणून त्यांच्यासाठी पाणी व अन्नाची सोय व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक घरटे या पक्षांसाठी तयार केले. या घरट्यात पाणी टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक भांडे तयार केले आहे. हे घरटे झाडावर बांधून त्यामध्ये पाणी व अन्नाची सोय केली आहे. झाडावर बांधलेल्या या घरट्यात सध्या रोज पाणी टाकले जाते.
पक्ष्यांची किलबिलाट
या उपक्रमामुळे आता शाळा परिसरात सतत पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला मिळत आहे. या उपक्रमात आरती धोत्रे, अपेक्षा साळवे, राणी चव्हाण, शीतल भानुसे, निकिता ढेम्पे, नीता गायकवाड, अश्विनी किल्लेदार, ओम पैठणकर, आदित्य साळवे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर व आकर्षक असे घरटे तयार केले आहे. त्यांच्या सृजनशिलतेचे शिक्षकांनी कौतुक केले आहे.
आमच्या शाळेच्या प्रांगणात भरपूर झाडे आहेत. त्यामुळे आम्हाला शाळेत प्रसन्न वाटते. शाळेत विविध पक्षी नेहमी येताना दिसतात. त्यांचा आवाज ऐकायला आवडते. उन्हाळ्यात या पक्ष्यांना अन्न व पाणी मिळणार नाही म्हणून या पक्ष्यांना खायला व पाणी प्यायला मिळावे यासाठी आम्ही पक्षांसाठी सुंदर घरटे तयार केले आहे, असं विद्यार्थिनी आरती घोत्रे हिने सांगितले.
Video : घराच्या गच्चीवर भरते पक्षांची शाळा, पाहा कोण लावतं हजेरी?
पक्षांसाठी अशी सोय करावी
आम्ही आमच्या शाळेत दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी व अन्न याची सोय करतो. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून घरटे तयार घेतली. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्षांसाठी अशी सोय केली पाहिजे, असं मुख्याध्यापक सुभाष पारे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.