नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 20 मार्च : फळांचा राजा आंब्याची गोडी चाखण्यासाठी अनेकांना उन्हाळ्याची प्रतीक्षा असते. आता मार्च महिन्यात आंब्याची आवक सुरू झाली आहे. जालना शहरातही देवगडचा हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झालाय. हा आंबा सर्वाधिक फेमस असल्यानं त्याच्या नावाखाली अनेकदा फसवणुकीचे प्रकारही घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी हे आपण पाहूयात
कसा ओळखावा अस्सल हापूस?
राजू पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून आंब्याचा व्यवसाय करतात. त्यांनी गेल्या आठवड्यासून जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टॉल लावले असून त्यामध्ये ते हापूस आंब्याची विक्री करतात. जालना शहरातील आझाद मैदान परिसरात त्यांचा स्टॉल आहे. सध्या तिथं 900 ते 1100 रुपये प्रती डझन हापूसचा भाव आहे.
जालना शहरातील आणखी काही महत्वाच्या ठिकाणी देखील हापूस आंब्याचे स्टॉल सुरू झाले आहेत. मात्र ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण कोकणातील अस्सल हापूसऐवजी अन्य आंबा ग्राहकांना देण्याचं प्रमाण वाढलं आहे.
राजू पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अस्सल हापूसला सुगंध असतो. या सुगंधावरुन आपण त्याची पारख करु शकतो. त्याबरोबर त्या आंब्याची साल ही कमी जाडीची आणि पातळ असते. हा आंबा कापल्यानंतर गडद केसरी रंगाचा असतो. तर इतर हापूस हा फिकट रंगाचा असतो. बनावट हापूस आंब्याची साल जाड असते. या प्रकारे ग्राहक अस्सल हापूस आंब्याती पारख करु शकतात.
हापूस आणि मलावी आंब्यातील फरक तुम्हाला माहिती आहे का?
कोकण प्रांतामधील हापूसची चव, रंग, पौष्टीकता वगैरे गोष्टी या भौगोलिकतेमुळे वेगळ्या आहेत. हापुस आंबा फक्त कोकणातच तयार होतो त्यामुळे अन्य कोणत्याही प्रत असूच शकत नाही व त्याची कोणाशीही स्पर्धा होऊ शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.