नारायण काळे, प्रतिनिधी
जालना, 29 मार्च : जालना शहरात सध्या कृषी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, तसंच शेतीमधील नवीन प्रयोगाची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर तब्बल साडेआठ फुट उंच आणि 1 टन वजनाचा 'रावण' हा वळू सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बनलाय. जालना सारख्या एखाद्या शहरात फ्लॅट खरेदी करता येईल इतकी म्हणजे तब्बल 25 लाख रुपये या वळूची किंमत आहे.
काय आहे विशेष?
नांदेड जिल्ह्यातील लोहा भागात आढळणाऱ्या लाल कंधारी जातीचा हा वळू आहे. मजबूत बांधा आणि डौलदार शैली असं या रावणाचे वैशिष्ट्य असल्याचे या वळूचे मालक विश्वनाथ जाधव यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात हा वळू फिरलाय. पुण्यातील एका डॉक्टराने हा खरेदी करण्यासाठी तब्बल 25 लाखांची ऑफर दिली होती, असा दावा त्यांनी केला. येत्या काही दिवसात हा रावण संपूर्ण देशभर फिरणार असून विदेशातही जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सिताफळाचे भाव पडले म्हणून शेतकऱ्यानं शोधला नवा उद्योग,आता करतोय लाखोंची कमाई, Video
काय आहे खुराक?
रावणाच्या या खुराकावर जाधव कुटुंबीय मोठा खर्च करते. सकाळ-संध्याकाळ 10 लीटर दूध, पाच ते सहा अंडी आणि गव्हाची कणीक असा याचा खुराक आहे. या वळूचे वय तीन वर्ष असून तो चार दातांचा आहे. त्याची आणखी फुटभर वाढ होऊ शकते. अजस्त्र आकारामुळेच त्याचे नाव रावण ठेवल्याची माहिती अजय जाधव यांनी दिली.
मुलांपेक्षा जास्त काळजी
जाधव कुटुंबीय या बैलापासून रेतन करून दिवसाला दोन ते अडीच हजारांचा नफा कमावतात. एका गायीला रेतन करण्यासाठी 500 रुपये आकारले जातात. आमच्या मुलापेक्षा जास्त नाव या रावणानं काढलंय. आम्ही याची मुलापेक्षा जास्त काळजी घेतो. एवढ्या मोठ्या आकाराचा बैल सहसा या जातीत आढळत नाही. 25 लाखांची ऑफर आल्यानंतरही आम्ही त्याला विकणार नसल्याचं विश्वनाथ जाधव यांनी स्पष्ट केलं.
छोट्या मुलांची मोठी कृती, पक्षी वाचवण्यासाठी झटतायत विद्यार्थी! Video
दरम्यान, शिर्डीमध्ये झालेल्या पशू प्रदर्शनात देखील रावण सहभागी झाला होता. तिथे देखील या वळूने सगळ्यांचे लक्ष वेधले. शिर्डी वरून नांदेड ला जात असताना आम्हाला जालना शहरातील कृषी प्रदर्शन बाबत माहिती मिळाली अन् आपण इथे आल्याची माहिती अजय जाधव यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Jalna, Local18