जालना, 25 डिसेंबर : जालन्यातील वस्तीवर सशस्त्र दरोडा (robbery) पडला आहे. दरोडेखोरांनी जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा रोडवरील पिंपळखुंटा शेतवस्तीवर दरोडा टाकला आहे. महिलांवर हल्ला करुन दरोडेखोरांनी दागिने (Gold ornaments) आणि रोख रक्कम पळवली (Cash looted). दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी (3 woman injured) झाल्या आहेत.
शेजारील घरांच्या कड्या लावून दरोडा
या दरोड्यात दरोडेखोरांनी शेजारील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून महिलांना कुऱ्हाड, शस्त्राने वार करून जब्बर मारहाण केली. यानंतर महिलांच्या अंगावर असलेले सोन्या - चांदीचे दागिने हिसकावत, घरातील लोखंडी पेटीत तोडून पेटीतील 15 हजार रोख, सोन्याची अंगठी असे एकूण 4 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
या दरोड्यात सखुबाई रामदास खोबरे, रंजना संजय गाडेकर,लता रमेश गाडेकर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना जालन्यातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचा : पैलवान नागेश कराळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली समोर
दोन महिन्यांपूर्वी दरोडेखोरांकडून महिलांवर सामूहिक बलात्कार
औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सशस्त्र दरोडा पडला होता. मध्यरात्री पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला केला. त्यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात ही घटना घडली आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला होता. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटनासमोर आली. सुरुवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा दाख दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला होता.
माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं
माजी आमदाराच्या ड्रायव्हरकडून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणाच्या पानिपत शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीचा माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
पीडित करण याने सांगितले की, तो छजपूर येथील निवासी आहे. रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या गावाला जात होता. त्यावेळी धान्य गोदामाच्या जवळ येताच नंबर नसलेल्या बाईकवर आलेल्या तरुणांनी त्याच्या अंगावर मिरची पूड टाकली. यावेळी करण याच्या डोळ्यातही मिरची पूड गेली. त्यावेळी चोरट्यांनी करणच्या जवळील 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.