जालना, 20 मार्च : कोरोना संदर्भात जालनेकरांना एक गुड न्यूज आली आहे. कोरोना संशयित आढळलेल्या चायना रिटर्न व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला कोरोना संसर्ग न झाल्याचे आता स्पष्ट झालं असून जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर संशयित हा घनसावंगी तालुक्यातील कुंभारझरी गावाचा रहिवासी असून तो काही दिवसांपूर्वीच चीनवरून परतला होता. त्याला सध्या कुठल्याही प्रकारचा त्रास नसलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आलं होतं. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या 34 व्यक्तींना देखील होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं.
दरम्यान, सदर रुग्णाचा वैद्यकीय अहवाल काय येतो याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. मात्र त्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने आता सामान्य नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
'गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल'
कोरोना व्हायरसच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्याच्या संदर्भात शासन काय उपाययोजना करत आहे आणि नागरिकांनीही त्याला सहकार्य करणं अपेक्षित आहे, याबाबत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे वाचा : 'तो' मृत्यू Coronavirus मुळे नाही; पाचव्या बळीबद्दल सरकारने दिलं स्पष्टीकरण
अजित पवार यांनी सांगितलं की, प्रत्येक राज्यात मेडिकल टीम पाठवल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील. रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे.
हे वाचा - Coronavirus : देशातला आकडा 223; परदेशातून महाराष्ट्रात आलेले 281 निरीक्षणाखाली