Home /News /maharashtra /

एका क्षणात दोन लाचखोर अधिकाऱ्यांचा भांडाफोड, पोलिसांच्या छाप्यानंतर अकडले जाळ्यात

एका क्षणात दोन लाचखोर अधिकाऱ्यांचा भांडाफोड, पोलिसांच्या छाप्यानंतर अकडले जाळ्यात

32 वर्षीय व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचल्यानंतर लाचखोर अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला.

जळगाव, 21 ऑगस्ट : जळगावमध्ये वाळू व्यावसायिकाकडून महसूल विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 32 वर्षीय व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचल्यानंतर लाचखोर अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पोलिसांनी उपविभागीय अधिकारी दिपमाला जयपाल चौरे (वय-36), तसंच आणखी एक उपविभागीय अधिकारी अतुल अरुण सानप, (वय-32) यांच्यावर कारवाई केली आहे. तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील परवाना आहे. मात्र असं असतानाही सदर वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने एमआयडीसी परीसरात पकडून सदर ट्रक एमआयडीसी पोलीस स्टेशनला उभे केले होते. हे ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात दिपमाला चौरे यांच्यावतीने त्यांच्या समक्ष अतुल सानप यांनी दि.20/08/2020 रोजी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 2,00,000/-रूपये लाचेची मागणी केली. वाळू व्यावसायिकाकडे महसूल अधिकाऱ्यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली असता तडजोडीअंती 1 लाख 25 हजार रुपये घेण्याचं ठरलं. सदर लाचेची रक्कम आरोपी अतुल सानप यांनी पाठवलेल्या एका व्यक्तीने स्वीकारली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव परीसरातच झाला. परवाना असतानाही वाळू व्यावसायिकाकडून अधिकारी पैसे उकळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून आरोपींवर कारवाई केली आहे. संजोग बच्छाव, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोना.मनोज जोशी,पोना.सुनिल शिरसाठ, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असं आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्याकडून करण्यात आलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या