मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी रेल्वेत बसवलं अन् उतरताना लेकाचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी रेल्वेत बसवलं अन् उतरताना लेकाचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

दादर अमृतसर एक्स्प्रेस

दादर अमृतसर एक्स्प्रेस

Jalgaon news : हरिद्वार येथे यात्रेसाठी आई वडिलांना सोडण्यास गेलेल्या मुलाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी

जळगाव, 26 मे : आईवडिलांना देवदर्शनासाठी सोडायला रेल्वे स्थानकावर गेलेल्या शिक्षक मुलासोबत धक्कादायक घटना घडली आहे. हरिद्वार येथे यात्रेसाठी जाणाऱ्या आई-वडिलांना रेल्वे गाडीत बसवलं, इतक्यात गाडी सुरु झाली, त्यामुळे घाई गडबडीत उतरत असताना पडून रेल्वेखाली सापडल्याने शिक्षक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. यात योगेश गंभीरराव पाटील या शिक्षकाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाला आहे.

काय आहे घटना?

चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे या गावातील योगेश पाटील हे मूळचे रहिवासी आहेत. ते आई वडिलांसह चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनीत वास्तव्यास होते. आपल्या वृद्ध आई वडिलांना हरिद्वारची यात्रा घडावी, यासाठी योगेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रवासाचे नियोजन केले होते. रेल्वेने जायचे असल्याने दादर अमृतसर या रेल्वे गाडीचे आरक्षण मिळाले होते. त्यानुसार पहाटे योगेश पाटील हे त्यांच्या आई वडिलांना सोडण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गेले. याठिकाणी दादर अमृतसर या एक्स्प्रेसमध्ये योगेश पाटील यांनी आई वडिलांना बसविले. आई वडिलांशी बोलत असतानाच रेल्वे सुरू झाली. काही वेळातच गाडीचा वेग वाढला. यादरम्यान योगेश पाटील हे घाईत रेल्वे गाडीतून उतरताना त्यांचा तोल गेला व खाली पडून ते रेल्वे गाडीत ओढले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.

वाचा - भंडाऱ्यात दृश्यमसारखी घटना, 4 वर्षांनंतर मारेकरी सापडले; पण तरुणीचा मृतदेह अजूनही गायब

मुलाच्या मृत्यूने अर्ध्यातूनच आईवडील घरी पतरले

ज्या रेल्वे गाडीत आई वडिलांना बसविले, उतरताना पडल्याने त्याच रेल्वे गाडीच्या खाली येऊन योगेश पाटील यांचा मृत्यू झाला. दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्थानकावरुन गाडी निघून गेली होती. मुलगा योगेश पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना नातेवाईकांनी फोनवरुन रेल्वेत बसलेल्या योगेश पाटील यांच्या वडिलांना कळविली. त्यानुसार पाचोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर योगेश पाटील यांचे आई वडील गाडीतून उतरले. व खाजगी वाहनाने चाळीसगावकडे परतले. काही तासांपूर्वी ज्या मुलाने आपल्याला यात्रेसाठी रेल्वेत बसवले, त्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने आई वडिलांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

मयत योगेश पाटील हे चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच योगेश पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धर्मा रामा वाघ यांचे जावई होते. घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांच्या शाळेतील सहकारी शिक्षकांनीही रुग्णालयात गर्दी केली होती. मयत योगेश पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Jalgaon, Train accident