Home /News /maharashtra /

रक्ताने पत्र लिहिलं, उद्धव ठाकरेंना खंबीर साथीचं आश्वासन, भडगाव घोषणांनी दणाणलं

रक्ताने पत्र लिहिलं, उद्धव ठाकरेंना खंबीर साथीचं आश्वासन, भडगाव घोषणांनी दणाणलं

सर्वसामान्य शिवसैनिक हा पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांच्याच बाजूला आहे, असा एल्गार भडगावच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 25 जून : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी खळबळ उडाली आहे. विशेषत: शिवसेनेचे (Shiv Sena) दिग्गज नेतेमंडळी आणि आमदार एकनाथ शिंदे यांना जावून मिळाली आहेत. शिवसेनेचा हा सर्व बंडखोर आमदारांचा गट सध्या गुवाहाटीत एका हॉटेलमध्ये थांबला आहे. या गटाकडून महाविकास आघाडी सरकार कोसळून नवे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचं मानलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या गटाने पुकारलेल्या या बंडामुळे मुख्य शिवसेनेवर मोठं संकट कोसळलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे एका बाजूला आणि शिंदे यांचा गट दुसऱ्या बाजूला अशी फुट पडल्याचं सध्याचं चित्र आहे. पण सर्वसामान्य शिवसैनिक हा पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांच्याच बाजूला आहे, असा एल्गार भडगावच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा जो गट बंडखोरी करुन आसामला गेलाय तोदेखील परत येईल. त्यांनी परत यावं यासाठी भडगावच्या शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. शिवसैनिकांनी ते पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला पाठवलं आहे. या पत्रात उद्धव ठाकरे यांना शिवसैनिक आपल्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात मागे फिरा, आपल्या पक्षात पुन्हा सामील व्हा असं आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे. ('अडीच वर्षात राष्ट्रवादीने शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला', श्रीकांत शिंदेंचं आक्रमक भाषण) शिवसैनिकांनी भडगावात शुक्रवारी चांगलंच शक्तीप्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुमारे साथ है, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. या घोषणांनी भडगाव अक्षरश: दणाणून सुटलं. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी आपण शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांना दिलं. तसेच रक्त सांडून उभी केलेली संघटना कोणालाही हिसकावू देणार नाही, असं शिवसैनिक पत्रात म्हणाले आहेत. या दरम्यान एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात भडगावच्या शिवसैनिकांनी भावनिक आवाहन केलं आहे. शिंदे महाराष्ट्रात परत या, अशी साद त्यांनी घातली आहे. भडगावच्या छञपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी शुक्रवारी जय भवानी, जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं. आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्र्याच्यासोबत आहोत, असे मत युवासेना जिल्ह्या सरचिटणीस लखीचंद पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष गोरख पाटील, शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, मनोहर चौधरी, गणेश अण्णा चौधरी, दिपक पाटील, जे.के. पाटील, प्रमोद पाटील, राहुल पाटील, अनिल पाटील, विश्वास पाटील, माधव राजपूत, भाऊसाहेब पाटील, पुष्पाताई परदेशी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या