Elec-widget

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यासह 48 जण दोषी

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यासह 48 जण दोषी

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने शनिवारी दोषी ठरवले.

  • Share this:

दीपक बोरसे,(प्रतिनिधी)

धुळे, 31 ऑगस्ट- 45 कोटींच्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने शनिवारी दोषी ठरवले. तसेच सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे पोलिसांना आदेश न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी दिले आहे. दुपारी अडीच वाजता शिक्षेचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. घरकुल घोटाळ्यामुळे जळगाव महापालिकेवर कोट्यवधींचे कर्ज झाले आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून त्या जळगाव शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोर्टात केला.

strong>काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.

मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

Loading...

याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी 2006 रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.

या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा एकूण 90 जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आणि संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही मार्च-एप्रिल 2008 पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती. संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्षे हा तपास रेंगाळला. जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे अटकसत्र सुरू झाले. सुरेश जैन यांना या प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. अधिकृतपणे साडेचार वर्षे कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी शिक्षेतला बराच काळ आजारपणाच्या नावाखाली आलेशान रुग्णालयात ऐशोआरामात काढला होता.

दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाविषयी आवाज उठवल्यानंतर न्यायमूर्ती पी बी सावंत आयोग, सुधाकर जोशी आयोग, सोनी आयोग या तीन आयोगांमार्फत जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाची चौकशी झाली.

93 संशयितांवर दाखल झाला होता गुन्हा..

जळगाव महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या लक्षात हा गैरव्यवहार आल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 3 फेब्रुवारी 2006 रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुमारे 45 कोटींच्या गैरव्यवहाराबाबत 93 संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार 57 पैकी 53 आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सुरेश जैन यांनाही झाली होता अटक..

याप्रकरणी सुरेश जैन यांना 11 मार्च 2012 ला अटक झाली होती. साडेचार वर्ष ते कारागृहात राहिल्यानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका झाली. गुलाबराव देवकर हे देखील तीन वर्ष कारागृहात होते. सध्या तेही जामिनावर आहेत. 2014 मध्ये सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणूक कारागृहातून लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच गुलाबराव देवकर यांचा 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट, घटनास्थळावरील LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...