गणेश विसर्जनादिवशीच कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, 3 भावांनी गमावला जीव

गणेश विसर्जनादिवशीच कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, 3 भावांनी गमावला जीव

मृत तरुणांमध्ये दोन सख्खे व एक चुलत अशा तीन भावांचा समावेश आहे.

  • Share this:

जळगाव, 1 सप्टेंबर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणपती विसर्जन उत्साहात पण साधेपणाने करण्यात येत आहे. मात्र अशातच जळगाव जिल्ह्यात मात्र एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या विरवाडे येथील गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

गणपती विसर्जनावेळी जीव गमावलेल्या तरुणांमध्ये दोन सख्खे व एक चुलत अशा तीन भावांचा समावेश आहे. हे तीनही तरुण गणपती विसर्जनासाठी नदीवर गेले होते. गणेश मूर्ती घेऊन हे तरुण नदीत उतरले. मात्र नंतर पोहताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. नंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

मृतांची नावे :

सुमित भरत सिंह राजपूत

कुणाल भरत सिंह राजपूत

ऋषिकेश रजेसिंग राजपूत

सदर घटनेने विरवाडे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. प्रशांत वसंत गुंजाळ (वय-27) असं मृत लष्करी जवानाचं नाव आहे.

प्रशांत गुंजाळ हे अरुणाचल प्रदेशात लष्करात कार्यरत होते. नुकतेच ते 2 महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आले होते आणि गणेश विसर्जनासाठी गेल्यानंतर प्रशांत गुंजाळ यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, महाराष्ट्रात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आलं असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात आज एकूण 16 जण बुडाले असून यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 1, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या