आरोप सिद्ध करा नाही तर नुकसान भरपाईस तयार राहा, खडसेंनी दिला इशारा

आरोप सिद्ध करा नाही तर नुकसान भरपाईस तयार राहा, खडसेंनी दिला इशारा

अंजली दमानिया यांना राजकारणात काहीही करण्यासारखं राहिलं नाही म्हणूनच ते माझा छळ करत आहे.

  • Share this:

राजेश भागवत,(प्रतिनिधी)

जळगाव,12 जानेवारी: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्यावरती बेछूट आरोप केले होते. या आरोपात काहीही तथ्य नाही, असं आमचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात 27 न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहे. अंजली दमानिया यांनी आरोप सिद्ध करावे, अन्यथा नुकसान भरपाईस तयार रहावे, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी जळगाव न्यायालयाने दमानियांना समन्स जारी केले आहे. दमानियांना येत्या 23 जानेवारी स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात दमानिया आणि खडसे यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. एकनाथ खडसे यांनी रविवारी जळगाव येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. अंजली दमानिया यांना राजकारणात काहीही करण्यासारखं राहिलं नाही म्हणूनच ते माझा छळ करत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. या खटल्याची सुनावणी 23 जानेवारीला जळगावात होणार आहे. मात्र, राजकीय विषयांवर बोलण्यास खडसेंना नकार दिला.

काय आहे दमानियाविरुद्ध खडसे वाद?

भोसरीत जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली.

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

दरम्यान, मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.

याच प्रकरणी एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांनी निराधार आरोप करत आपली बदनामी केल्याचं म्हणत दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 12:29 PM IST

ताज्या बातम्या