प्रशांत बाग, जळगाव, 10 एप्रिल : अमळनेरमध्ये भाजपच्या जाहीर सभेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी माजी आमदाराला बेदम मारहाण केली. शहरात आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दीक चकमक सुरू असतांना हाणामारीत रूपांतर झाले. कार्यकर्त्यांनी अक्षरश:बुटाने पाटील यांना मारहाण केली. कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की, महाजनांनी अक्षरश: कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली ढकलून दिले. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांनी माजी आमदार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला.एकीकडे हा गोंधळ सुरू होता तर दुसरीकडे 'स्मिता वाघ आगे बढो', अशा घोषणा देण्यात आल्या.