'...म्हणून मी माझी किडनी विकत आहे', भाजप नगरसेवकाच्या भूमिकेने खळबळ

'...म्हणून मी माझी किडनी विकत आहे', भाजप नगरसेवकाच्या भूमिकेने खळबळ

ठाकूर यांच्या भूमिकेमुळे भुसावळ नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

जळगाव, 14 जुलै : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या एका नगरसेवकाने स्वतःची किडनीच विकायला काढली आहे. महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर असे त्या नगरसेवकाचे नाव आहे. ठाकूर हे भाजपकडून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, भुसावळ नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. सत्ता असताना देखील आपल्या प्रभागात निधीअभावी विकासकामे होत नसल्याने ठाकूर यांनी किडनी विकायला काढून भाजपला घरचा आहेर दिला आहे. ठाकूर यांच्या भूमिकेमुळे भुसावळ नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळातील प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपकडून महेंद्रसिंग ठाकूर निवडून आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते प्रभागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे तसेच प्रभागात पक्के रस्ते व्हावेत म्हणून नगरपरिषद प्रशासनाशी वारंवार चर्चा, लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करत आहेत. सर्वसाधारण सभेत देखील सातत्याने विषय मांडत आले आहेत. मात्र, त्यांनी मांडलेले विकासाचे विषय सत्ताधाऱ्यांकडून सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आलेले नाहीत.

2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचननाम्यानुसार त्यांना प्रभागातील कामे करायची होती. पण निधीचे कारण देऊन त्यांच्या प्रभागात विकासकामेच होत नाहीत. अखेर ठाकूर यांनी स्वतःची किडनी विकून प्रभागात विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्धपत्र केले जाहीर-

या विषयासंदर्भात महेंद्रसिंग ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन करण्यासाठी एक प्रसिद्धपत्र जाहीर केले आहे. या पत्रात ते म्हणतात की, रस्त्यांसाठी आलेला निधी शासनाकडे परत गेला आहे. नगराध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे जनतेच्या कामांसाठी आलेला निधी परत जात आहे. भुसावळ नगरपरिषदेत नियोजनशून्य कारभार सुरू असून कुठल्याही प्रश्‍नांची दखल घेतली जात नाही. मी माझी किडनी विकून प्रभागातील डांबरीकरण तसेच ट्रीमिक्स काँक्रिट रस्ते, पेव्हर ब्लॉक व शुद्ध पाण्यासाठी विविध ठिकाणी आरओ प्लॅन्ट लावून देणार आहे. माझ्या प्रभागात ही कामे जो कामे करून देईल, त्या मोबदल्यात मी माझी एक किडनी देण्यास तयार असून, गरजूंनी माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक ठाकूर यांनी केले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 14, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading