नितीन नांदरुकर, प्रतिनिधी
जळगाव, 25 जानेवारी : शनिवार म्हणजे शाळेत शुकशुकाट, पण यादिवशी शाळेत 100 टक्के विद्यार्थी कधी पाहिलेत? बरं, जिल्हा परिषदेतून खाजगी शाळेत अॅडमीशन ऐकलंय, पण खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणं, हे कधी पाहिलंय? हे सगळं जळगावच्या पिलखेड्यातल्या जिल्हा परिषद शाळेत होतंय. आणि याचं कारण ठरलंय शाळेत राबवला जाणारा एक अनोखा उपक्रम - दफ्तरमुक्त शाळा.
या शाळेत दर शनिवारी विनादप्तर मुलं शाळेत येतात, पण याचा अर्थ 'अभ्यासाला दांडी' असा नाही. उलट याच दिवशी मुलं जास्त अभ्यास करतात, तोही स्वखुशीने!
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हावं तसंच त्यांना नियमांचं, संस्कृतीचं ज्ञान यावं यासाठी यासाठी विविध विषयांवर त्यांना भाषण करायला, सामूहिक वृत्तपत्राचं वाचन करायला सांगितलं जातं. इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी यासाठी 'मी बोलणार, मी वाचणार' असा उपक्रमही सुरु करण्यात आलााय. यामुळे आत्मविश्वासही वाढला असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, शाळेतील विद्यार्थी दोन ते तीन दिवस शाळेत आला नाही, की त्याची स्वतः घरी जाऊन विचार करण्याचं काम केलं जातं. आजारी विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला वेळोवेळी पालकांना देण्याचं कामंही इथले शिक्षक करतात.
अनेकांसाठी शाळेला दांडी मारायचा दिवस या अनोख्या उपक्रमामुळे 'आवर्जुन शाळेत जायचा दिवस' झालाय. पिलखेळा शाळेतील शिक्षकांचा हा अनोखा उपक्रम इतर शाळांसाठी अनुकरणीय ठरो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.