नवी दिल्ली, 25 जून : आर्थिक वाढीसाठी आणि व्यापारासाठी जगभरातून आयात करणे हे चूक नाही, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचबरोबर गणेशमूर्तीही चीनमधून आयात करण्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गणेशमूर्तींची चीनमधून आयात करण्याची खरंच गरज आहे का, असा प्रश्नच त्यांनी यानिमित्तानं संपूर्ण देशवासियांसमोर उपस्थित केला आहे.
उद्योगांसाठी देशात उपलब्ध नसलेला कच्चा माल इतर देशांतून आयात करणे योग्यच आहे, त्यात चूक काहीही नाही, असे सीतारमण यांनी म्हटले आहे. मात्र गणेशमूर्तींच्या आयातीबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तामिळनाडूतील भाजपा कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर स्थानिक मूर्तीकारांकडून पारंपरिकरित्या गणेश मूर्ती खरेदी केल्या जातात, मात्र आता याच मूर्ती चीनमधून आयात करण्यात येत आहेत, आपण स्थानिक पातळीवर या मूर्ती घडवू शकत नाही का, ही स्थिती का निर्माण झाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आवश्यक वस्तूंची आयात चूक नाही
ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनांना मदत होईल, त्यांची वाढ होईल, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, अशा वस्तू आयात करण्यात काहीही चुकीचे नसल्याचे निर्मला सीतारमण यांचे म्हणणे आहे. अशा वस्तूंची आयात व्हायलाच हवी, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र ज्या वस्तूंच्या आयातीने रोजगार मंदावतो किंवा आर्थिक वाढ खुंटते, अशा वस्तूंच्या आयातीने देशाच्या स्वावलंबनावर परिणाम होतो, आणि देशाची अर्थव्यवस्थाही खुंटते याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची आयात योग्य नव्हे
साबण ठेवण्याचे डब्बे, प्लास्टिकच्या वस्तू, उदबत्त्या यासारख्या घरगुती वस्तूंच्या आयातीने स्वावलंबी भारत अभियानाला तडा जातो, असे सीतारमण यांचे म्हणणे आहे. आयात करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन हे भारतातील लघू आणि मध्यम उद्योगही करतायेत. अशा परिस्थितीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंना देशवासियांनी स्वीकारायला हवे आणि उद्योगांना प्रोत्साहित करायला हवे. निर्मिती आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजेच स्वावलंबी भारत या अभियानाचा मुख्य उद्देशच ज्या वस्तू देशात उत्पादित होऊ शकतात, त्यांची आयात न करणे, हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.