पिंपरी चिंचवड, 12 मे : आज 12 मे म्हणजेच जागतिक परिचारिका दिन. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका आपलं कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टरांनी दिलेली औषधं संबधित कोरोनाबाधिताला व्यवस्थित देण्यापासून त्याची संपूर्ण देखभाल करणाऱ्या परिचारिकांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यातील आपल्या सहभागा बद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
मात्र ,जीवाची जोखीम पत्करून देखील आपलं वेतन कपात केलं गेल्याने परिचारिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने आपल्या वेतनात 25 टक्क्यांची कपात केली असल्याचं या परिचारकांचं म्हणणं आहे. शिवाय कुठलीही जोखीम किंवा प्रोत्साहन भत्ता न देऊन शासन आपल्यावर अन्याय करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या लढ्यात प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या परिचारिकांच्या शासनाकडून असलेल्या काही अपेक्षा :
1. अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना लॉकडाऊनमुळे इतरांना सुट्या होत्या, तरीही पगाराचे धोरण ठरवताना शासनाने याचा विचार केला नाही. सरसकट सर्वांसाठी एकच निर्णय घेतला गेला. सुट्ट्या न घेता अविरतपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय झाला आहे, तो लवकर दूर व्हावा.
2. परिचारिका व्यवसायासाठी बेसिक शैक्षणिक पात्रता व कामाचे स्वरूप, रुग्णसेवा सगळीकडे सारखीच असतानाही केंद्र सरकार व राज्य सरकारी परिचारिकांच्या वेतनात व भत्यांमध्ये बरीच तफावत आहे ही तफावत दूर व्हावी.
3. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिल्याप्रमाणे रुग्णसंख्येच्या प्रमाणात परिचारिकांचे प्रमाण ठेवावे
4. डॉक्टर, नर्सेस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना सुरक्षितता पाहिजे, तसेच त्यांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्यांवर कायद्याचा वचक पाहिजे.
5. मानधानावरील नर्सेसना देखील समान काम - समान वेतनश्रेणी मिळायला हवी.
6. परिचारिकांची मानधनाऐवजी कायमस्वरूपी नियमित वेतनश्रेणीमध्ये भरती व्हावी.
7. कोरोनासारख्या पॅनडेमिकमध्ये काम करणाऱ्या नर्सेसना जोखीम भत्ता, प्रोत्साहन भत्ता मिळायला पाहिजे.
8. परिचारिकांच्या निरपेक्ष रुग्णसेवेचे नोंद जागतिक पातळीवर घ्यायला पाहिजे. जास्तीत जास्त परिचारिकांना पुरस्कारीत करून प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांचा सन्मान वाढविला पाहिजे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.