Home /News /maharashtra /

खंडणी आणि मारहाण प्रकरणातून उदयनराजे भोसलेंची निर्दोष मुक्तता

खंडणी आणि मारहाण प्रकरणातून उदयनराजे भोसलेंची निर्दोष मुक्तता

लोणंद येथील सोना अलाईन्स कंपनीच्या व्यवस्थपाकाला मारहणा प्रकरणात उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सातारा, 27 जानेवारी : साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना खंडणीप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.  लोणंद येथील सोना अलाईन्स कंपनीच्या व्यवस्थपाकाला मारहाण प्रकरणात उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांची  निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2017 मध्ये  सोना अलाईन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण करुन २४ लाखांची खंडणी मागितल्याचा उदयनराजे भोसले यांच्यावर आरोप होता. राजकुमार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी उदयनराजे भोसलेंसह 9 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आज सातारा जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणी उदयनराजेंसह सर्व आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे प्रकरण? साताऱ्यातल्या लोणंदमध्ये सोना अलाईन्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते, असा आरोप उदयनराजे यांनी केला होता. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2017 रोजी उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतलं. तेथे पोहोचल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर उदयनराजे आणि सहकाऱ्यांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उदयनराजे आणि त्यांच्या 9 साथीदारांवर 22 मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात 9 जणांना पोलिसांनी 23 मार्चला अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजे काही दिवस अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उदयनराजे काही दिवसांनी अचानक साताऱ्यात प्रकटले आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सातारा शहरात रोड शो केला आणि पुन्हा गायब झाले. त्यानंतर  उदयन राजे स्वत: सातारा पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाले होते. अखेर या प्रकरणाचा दोन वर्षांनंतर निकाल लागला. यात उदयनराजेंची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Udayan raje bhosle

पुढील बातम्या