• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार

नागपूरमध्ये भररस्त्यावर तरुणावर अंदाधुंद गोळीबार

इम्रान सिद्दिकी त्याच्या काही मित्रांसोबत उभा असताना ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

  • Share this:
नागपूर, 07 मार्च : नागपूर उमरेड मार्गावरील दिघोरी पुलाजवळ गजबजलेल्या चौकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इम्रान सिद्दिकी नावाच्या तरुणावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार केला. ज्यामध्ये इम्रानला दोन गोळ्या लागल्या असून त्याला गंभीररित्या जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान सिद्दिकी त्याच्या काही मित्रांसोबत उभा असताना ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. इम्रानला दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून बुलेटचे शेल जप्त केले आहे. प्राथमिक दृष्टया ही घटना जुन्या वैमानस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.  या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना एक देशी  बनावटीचे पिस्तुल आणि 8 राऊंड गोळ्यांसह अटक केली आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार! दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारातून सिद्धावा जायभाये थोडक्यात बचावल्या आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाये या मुंबई अहमदाबाद महामार्गावरून आपल्या घरी जात असताना विरार जवळील नोव्हेल्टी हॉटेलजवळ पोहोचल्या होत्या. तिथूनच पुढे असलेल्या बर्गर किंगमध्ये काही तरी घेण्यासाठी त्या गाडी थांबवून उतरल्या होत्या. बर्गर किंगकडे जात असताना त्याचवेळी एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून येऊन जायभाये यांच्यावर 1 राउंड फायर केला आणि दुसरा राऊंड फायर करणार इतक्यात त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड फेकून मारला असता तो पळून गेला आहे. या हल्लेखोराने मास्क लावलेला होता. अंगात फुल्ल रेड ब्लॅक जॅकेट घातलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. हे हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांनी सिद्धावा जायभाये यांच्यावर गोळीबार का केला, याचा तपास पोलीस करीत असून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग,अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published: