शरद पवारांच्या 'त्या' भूमिकेवर काँग्रेस नाराज, बाळासाहेब थोरात म्हणाले....

शरद पवारांच्या 'त्या' भूमिकेवर काँग्रेस नाराज, बाळासाहेब थोरात म्हणाले....

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : 'चीन प्रश्नी काँग्रेस सरकारसोबत आहे, मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत खासदार राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही, तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. 1962 व आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे,' असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चीन प्रश्नाबाबत मांडलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

'45 वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खो-यात चीनच्या आगळीकीमुळे 20 जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणतात. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेस प्रमाणेच पवारसाहेबांनाही असेल,' असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

'पवार साहेब काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही'

'खा. राहुल गांधी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुलजींची चिंता ही देशाच्या अखंडतेशी सबंधित आहे. आजही मन की बात मांडतांना पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही. अशावेळी गप्प बसून कसे चालेल! भाजपने काँग्रेसच्या सूचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये! प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामळे राहुलजी आणि काँग्रेस प्रश्न विचारणारच आहे. पवार साहेब काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरून माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीनचिट आणि राहुलजींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आतताईपणा करू नये. मला खात्री आहे, पवार साहेबही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील,' अशी भूमिका थोरात यांनी घेतली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

'भारत चीन प्रश्नावर ही राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही,' असं शरद पवार म्हणाले होते.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 28, 2020, 7:17 PM IST

ताज्या बातम्या