बब्बू शेख, लासलगाव 14 ऑक्टोबर: आयकर विभागाने (Income Tax) लासलगाव परिसरातल्या 9 कांदा व्यापाऱ्यावर बुधवारी छापे घातले. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या विविध पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरू केली. व्यापाऱ्यांची कार्यालये, गोडावून, कागदपत्र यांची कसून तपासणी केली जात आहे. निर्यात बंदी करून देखील कांद्याचे भाव आटोक्यात येत नसल्याने केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 1998 पासून आजपर्यंत 22 वर्षात 17 वेळा कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. बडे व्यापारी कांद्यांचा साठा करून भावांमध्ये चढउतार निर्माण करतात असा आरोप केला जातो. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही तर फक्त दलालांची चांदी होते असाही आरोप केला जात आहे.
कांदयाचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरुद्ध टीकाही झाली होती. आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. त्या काळात महागाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं.
कांद्याची निर्यात थांबली तर भाव आटोक्यात येतील असा अंदाज होता. मात्र ज्या प्रमाणात भाव कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते नियंत्रणात येत नव्हते. लासलगाव ही कांद्यांची आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याच भागातून देशभर कांदा निर्यात केला जातो.
देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ‘जलयुक्त शिवार’च्या कामांची होणार SIT चौकशी
आत्तापर्यंत झालेल्या छाप्यांनंतर कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा गुन्हेही दाखल झालेले नाहीत. त्यामुळे हे छापेकशासाठी असा प्रश्न या भागात विचारण्यात येत आहे. अशा कारवायांमुळे साठेबाजी थांबत नाही किंवा कांद्याचे भावही कमी होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी शंकाही उपस्थित केल्या आहेत.