कल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन, शिवसेना-भाजप कुरघोडीत व्यस्त

कल्याणमध्ये मनसेकडून अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन, शिवसेना-भाजप कुरघोडीत व्यस्त

कल्याणच्या बहुचर्चित पत्री पुलाचं काम गेल्या 16 महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. याचा निषेध म्हणून मनसेने रविवारी (8 मार्च) अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन करत अनोखं आंदोलन केलं.

  • Share this:

कल्याण,8 मार्च:कल्याणच्या बहुचर्चित पत्री पुलाचं काम गेल्या 16 महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. याचा निषेध म्हणून मनसेने रविवारी (8 मार्च) अदृश्य पत्री पुलाचं उद्घाटन करत अनोखं आंदोलन केलं. शिवसेना-भाजपवर कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2018 मध्ये ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक बनल्यानं पाडण्यात आला होता. त्यानंतर आठ महिन्यात नवा पत्री पूल उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. नंतर फेब्रुवारी 2020 मध्ये पत्री पूल पूर्ण होण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, आता मार्च उजाडला तरी अजून पत्री पूल उभारणीचं काम पूर्ण झालं नाही. पुलाचं काम अजून प्राथमिक अवस्थेत आहे.

महापौरांच्या वक्तव्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संताप

त्यात केडीएमसी महापौरांनी पत्री पूल उभारायला आणखी 2-2 महिने लागतील, असे वक्तव्य केल्यानं कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे रविवारी मनसेनं अदृश्य पत्री पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन केलं. यावेळी पत्री पुलाच्या गर्डरला काळे फुगे लावत बॅनरवर हवेत उडणाऱ्या गाड्या दाखवण्यात आल्या. पत्री पुलावरुन सातत्यानं 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप मात्र कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. त्यामुळे आता तरी पत्री पूल उभारणीच्या कामाला गती मिळते का? हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा..राज यांचे व्यंगचित्रातून ताशेरे, म्हणाले.. लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे

कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकही बनला धोकादायक

दुसरीकडे, दहा वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एमएमआरडीए आणि केडीएमसीने 63 कोटी रुपये खर्चून कल्याण स्टेशन परिसरात उभारण्यात आलेला स्कायवॉक आता धोकादायक बनला आहे. कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकचा पत्रा कोसळून एक गाडीचालक जखमी झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. आयआयटीने अहवाल देत स्कायवॉकचे जिने आणि पुलाचा खालचा भाग धोकादायक असल्याचे यापूर्वी सांगितले होते.

हेही वाचा..‘तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नाही’, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारींचा पाढा

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रांत एमएमआरडीए आणि केडीएमसीने कोट्यावधी रुपये खर्चून स्कायवॉकची निर्मिती केली आहे. मात्र दहा वर्षांतच या स्कायवॉकचे जिने आणि पुला खालचा भाग धोकादायक झाल्याचा धक्कादायक अहवाल मुंबई आयआयटीने केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने दुरुस्तीचे काम केडीएमसीकडून लवकरच हाती घेण्यात असल्याची माहिती सिटी इंजिनियर सपना कोळी यांनी 'News18 लोकमत'ला दिली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची पूल कोंडीनंतर आता स्कायवॉक कोंडी होणार आहे.

First published: March 8, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या