आनिस शेख, प्रतिनिधीमावळ, 28 मे : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून या परिस्थितीत कर्तृव्य पार पाडत आहे. परंतु, पोलिसांनीही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. दौंडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, पोलिसासह कुटुंबाने कोरोनावर मात केली आहे.
देहूरोड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत विकास नगर येथे राहणाऱ्या पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह कुटुंबातील चार जणांचा कोरोना चाचणी बाबतचा अहवाल 13 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या सर्वांना उपचाराकरिता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा - दिवसभर दुचाकीवर फिरला आणि लोकांना भेटला, बीडमध्ये आता 12 गावात पूर्णपणे कर्फ्यू
त्यानंतर तब्बल 14 दिवसानंतर या कुटुंबातील चौघांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. यात सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. या कुटुंबातील 4 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हे कुटुंब एकत्र आपल्या घरी पोहोचले तेव्हा विकास नगर या भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले. तसंच त्यांना शुभेच्छा ही दिल्या.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एकाच कुटुंबातील चार जणांनी कोरोनावर केलेली मात ही शहरवासियांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.