औरंगाबाद, 11 जून : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यानंतर खैरेंचा पराभव हा माझा पराभव असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावरून आता निवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.
'उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घ्यायला हवी. एमआयएमचा विजय झाल्याने आता राज्यभर चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही शिवसेनेचा पराभव करून वंचित बहुजन आघाडी औरंगाबादमधील सातही जागा जिंकेल,' असं म्हणत इम्तियाच जलील यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
'तुमचा पराभव हा माझा पराभव आहे. खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे,' असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी खैरेंना दिला. 'औरंगाबाद उघड्यावर सोडणार नाही. पुन्हा औरंगाबादवर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही,' असा निर्धारदेखील उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे रविवारी जालना येथे दुष्काळी दौऱ्यावर आले होते. शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप करण्यात आले. उद्धव यावेळी म्हणाले की, 'तुम्ही मला मतं दिली. पण मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. म्हणून लोकसभा निकालानंतरही मी तुमच्यासमोर आलो आहे. शेतकऱ्यांना मदत केली नाही तर मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे. मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडणार ही योजना खूप चांगली. जनतेच्या आशीर्वादाशी कधी गद्दारी करणार नाही.'
VIDEO : EVM वरून अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातला विसंवाद उघड