मुंबई, 4 एप्रिल : 'वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी,' अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Reaction on Lockdown) यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
हेही वाचा - 'लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास आम्ही विरोध करणार', नवनीत राणांचा आक्रमक इशारा
त्यांनी 24x7 लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणुक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी, लोकांचा रोजगार सुरु राहील हे पहावे, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम च्या सुचना द्याव्यात अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या तसेच शासन कोविड नियंत्रणासाठी करत असलेल्या अथक् प्रयत्नांचेही उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले.
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, उद्योग विभागाचे डॉ. पी अन्बल्गन, यांच्यासह उद्योजक सर्वश्री. उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी,हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपुर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे, आनंद गांधी, सिद्धार्थ जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.