मुंबई, 3 जानेवारी: कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी असा डिसेंबरचा महिना संपल्याबरोबर थंडीनेही पाठ फिरवली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार 6 आणि 7 जानेवारीला पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस होऊ शकतो.
सध्या पश्चिमेकडून येणारे बााष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण करत आहेत. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. राजधानी दिल्लीत प्रचंड कडाक्याच्या थंडीनंतर अचानक शनिवारी ढग दाटून आले आणि विजांसह पाऊस झाला. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण होतं. या पश्चिमी वाऱ्यांचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवत आहे. त्यामुळेच किमान तापमानातही वाढ झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या खाली गेला होता. त्यात आता या ढगाळ वातावरणामुळे वाढ झाली आहे. पुढचे दोन ते तीन दिवस असंच वातावरण असेल, असं मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं.
IMD GFS guidance: 6, 7 जानेवरी, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच काही तुरळक ठीकाणी, हलक्या पावसाची शक्यता.@RMC_Mumbai pic.twitter.com/VhHuVkhsJy
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 3, 2021
गेल्या काही दिवसात राज्यातल्या बहुतेक ठिकाणी तापमानात वाढ झाली. पण पुन्हा एकदा थंडी परतणार आहे, असाही हवामानाचा अंदाज आहे. होसाळीकर यांनी नोंदवलेल्या अंदाजानुसार, राज्यातल्या किमान तापमानात येत्या ३,४ दिवसात लघु पडजड होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे इथे किमान तापमान 16-18 च्या आसपास असेल तर नाशिक, पुणे इथे 14-16 अंश सेल्सिअस तापमान असेल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 20°C दरम्यान असेल.